@maharashtracity
मुंबईबाहेरील ४० लाख प्रवाशांमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भिती
पालिकेचा कोरोनाबाबतचा ‘आराखडा’ सरकारला सादर
‘एमएमआर रिजन’मधून शहरात येतात ४० लाख प्रवासी
मुंबई: मुंबई महापालिकेने (BMC) राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईत कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवास करण्यासाठी सरसकट सवलत देण्यास पालिका प्रशासनाने नकारघंटा दर्शवली आहे.
मात्र कोरोनावरील लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासात सवलत देण्याबाबत पालिका प्रशासन विचार करीत असून राज्य सरकारसोबत आगामी दोन दिवसांत होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आदी भागातून नोकरी, रोजगारासाठी रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या ४० लाखांच्या आसपास आहे.
या सर्व नागरिकांना जर एकाच वेळी मुंबईत रेल्वेने येण्यासाठी परवानगी दिल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पालिकेने वर्तवली आहे. त्यामुळे पालिकेने सध्या तरी सर्वसामान्य नागरिकांना रेल्वेचे दरवाजे बंद ठेवण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे.
मुंबईत कोरोना नियंत्रणात आलेला असला तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता सरसकट निर्बंध शिथिल केल्यास कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारसह पालिकेनेही सावध पवित्रा घेत टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
पालिकेने, मुंबईतील कोरोनाजन्य परिस्थितीबाबतचा ‘आराखडा’ राज्य शासनाला सादर केला आहे. यामध्ये, मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ९२५ दिवसांवर गेला असून दररोज ३० हजारांवर चाचण्या होत असल्याचे म्हटले आहे. तसेच, सरासरी रुग्णवाढ ०.०७ टक्क्यांवर आली असून मृत्यू दरही एक टक्क्यापेक्षा खाली गेला आहे.