@maharashtracity

कोरानाचे नियम पाळून विद्यार्थ्यांनी शाळेत सहभाग नोंदवावा

विद्यार्थ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा

शाळेत प्रवेश करताना आणि शाळा सुटताना शारीरिक अंतर ठेवावे

वर्गात नेमलेल्या बाकांवरतीच बसावे, जागेची अदलाबदल करू नये

मुंबई: कोरोनामुळे तब्बल दीड वर्षांनी बंद शाळेचे व वर्गाचे दरवाजे उघडले गेले. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व वर्ग शिक्षकांनी, उपस्थित विद्यार्थ्यांना ‘कोरोना नियमांचे चांगलेच धडे’ दिले. (Mayor Kishori Pednekar taught corona lesson to students on first day of the school)

शाळेच्या पहिल्याच दिवशी, महापौरांनी, महापालिकेच्या वरळी सी फेस माध्यमिक शाळा, बीडीडी चाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका शाळा संकुल येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

इयत्ता आठवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी कोरानाचे नियम पाळून शाळेत सहभाग नोंदवावा. तसेच, विद्यार्थ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. शाळेत येताना व घरी जाताना सुरक्षित अंतर राखावे. शाळेत आल्यावर जुने मित्र, मैत्रिणी भेटल्याने त्यांच्यासाठी वर्गात जागेची अदलाबदल न करता, नेमलेल्या बाकांवरतीच बसावे, असे धडे महापौर किशोरी पेडणेकर यांनी व वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिले.

त्यामुळे विद्यार्थ्यांचा पहिला दिवस हा लेक्चर ऐकण्यात, थोडा अभ्यासात, कोरोना नियमांचे पालन करण्यात तर काही वेळ हा काहीशी मजा, गप्पागोष्टी करण्यात गेला. मुंबईतील शाळांमध्ये पालकांनी संमतीपत्र सादर केल्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे, असा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

याप्रसंगी, नगरसेवक अँड. संतोष खरात, सह आयुक्त (शिक्षण ) अजित कुंभार, उप शिक्षणाधिकारी संजीवनी कापसे, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व मनपा शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासन, टास्कफोर्स यांच्या मान्यतेने आणि आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच, पालिकेच्या सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण केले असून त्यासोबतच पिण्याच्या पाण्याच्या टाक्यासुद्धा निर्जंतुकीकरण करून घेण्यात आले असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.

तसेच, शंभर टक्के उपस्थितीची अट शिथिल करण्यात आली असून एका बेंचवर एक याप्रमाणे फक्त पंचवीस विद्यार्थ्यांना त्या – त्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. त्यासोबतच शाळेत न येणाऱ्या मुलांसाठी ऑनलाईन वर्गाचे सुद्धा आयोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचे दैनंदिन तापमान नोंदविल्यानंतरच प्रवेश देण्यात येत आहे.

२५ विद्यार्थी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी झाल्यानंतर आज ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे त्या विद्यार्थ्यांना उद्या प्रवेश न देता एक दिवसाआड या पद्धतीने प्रवेश देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी आपल्या तोंडावरची मुखपट्टी (mask) काढू नये तसेच आपले दप्तर घरी गेल्यानंतर निर्जंतुकीकरण करून घेणे.

तसेच विद्यार्थ्यांना आखून दिलेल्या चौकोनाप्रमाणे शाळेत प्रवेश करणे, तसेच प्रवेश केल्यानंतर आपले नाव व नंबर असलेल्या बेंचवर बसावे. साबणाने हात निर्जंतुकीकरण (sanitize hands) केल्यानंतरच पिण्याचे पाणी प्यावे. प्रत्येक वर्ग खोलीमध्ये विद्यार्थ्यांचे नावांची यादी लावण्यात आली आहे.

नियम पाळण्याबाबत सूचना ठिकठिकाणी स्टिकर स्वरूपात लावण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केल्यानंतर सहकाऱ्यांना मिठी मारू नये. तसेच टाळी देऊ नये. विद्यार्थ्यांना काही त्रास होत असल्यास त्यांनी तातडीने आपल्या शिक्षकांना सांगावे, अशा सूचना महापौरांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिल्या.

तसेच ज्या पालकांची प्रवासाची समस्या आहे त्या पालकांबाबत राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करून त्यांना रेल्वेचे पास मिळण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here