@maharashtracity
१२ वर्षांखालील ४ मुलींचा समावेश
१२ – १८ वयोगटातील १२ जण
६ कर्मचार्यांना बाधा
९५ जणांची चाचणी, २२ जणांना कोरोना
अनाथाश्रम पालिकेकडून ‘सील’
मुंबई: मुंबई सेंट्रल, आग्रीपाडा येथील ‘सेंट जोसेफ बोर्डिंग स्कूल’ (Saint Josef Boarding School) या अनाथाश्रम शाळेतील १६ मुलींना व ६ महिला कर्मचाऱ्यांना असे एकूण २२ जणांना कोविडची (covid) बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेने (BMC) तात्काळ या अनाथाश्रम शाळेला ‘सील’ ठोकले आहे.
पालिका आरोग्य खात्याने या अनाथाश्रमातील ९५ जणांच्या कोविड चाचण्या केल्या असून त्यापैकी २२ जणांना कोविडची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या २२ जणांमध्ये १२ वर्षाखालील ४ मुलींचा, तर १२ – १८ वयोगटातील १२ जणांचा आणि ६ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या घटनेची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने १२ वर्षाखालील ४ मुलींना नायर रुग्णालयातील (Nair Hospital) कोविड कक्षात तर उर्वरित १८ जणांना भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रूडस या कोविड जंबो सेंटरमध्ये (Covid Jumbo Center) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
प्राथमिक माहितीनुसार, या भायखळा,आग्रीपाडा येथील ‘सेंट जोसेफ बोर्डिंग स्कूल’ या अनाथाश्रम शाळेतील दोघांना कोविडची बाधा झाल्याचे २३ ऑगस्ट रोजी पालिकेच्या दवाखान्यात वैद्यकीय तपासणी दरम्यान आढळून आले. त्यानंतर पालिका आरोग्य विभागाने २४ ऑगस्ट रोजी या अनाथाश्रम शाळेत वैद्यकीय तपासणी शिबीर घेऊन तेथील ९५ मुली, कर्मचारी, शिक्षक आदींची आरटीपीसीआर चाचणी केली. ३५ ऑगस्ट रोजी चाचणी अहवालात २२ जणांना कोविडची बाधा झाल्याचे समोर आले.
या २२ जणांमध्ये, १२ वर्षांखालील ४ मुलींचा समावेश आहे. तर १२ – १८ वयोगटातील १२ जणांचा आणि ६ कर्मचार्यांचा समावेश आहे. या सर्व घटनाप्रकारामुळे या परिसरात एकाच खळबळ उडाली.
वैद्यकीय तज्ज्ञांकडून, कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्याचा लहान मुलांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता या गंभीर घटनाप्रकारामुळे लहान मुलांबाबत पालकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे समजते.