अनेक वर्षात खनिकर्म विभागाकडून खनिज उत्खननाची मोजणीच झाली नाही

By मिलिंद माने

@maharashtracity

महाड
रायगड जिल्ह्यात विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीमधून दगडाचे व मातीचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर चालू आहे. रायगड जिल्ह्यात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 व दिघी ताम्हणी मार्ग पुणे व जिल्ह्यातील अनेक राज्य मार्गांचे चौपदरीकरण मोठ्या प्रमाणावर चालू आहे. तसेच अनेक विकास कामांच्या प्रकल्पासाठी देखील दगडांचा व मातीचे उत्खनन ज्या खाणीतून होत आहे,त्या जागेवर भेट देऊन परवानगी एवढे उत्खनन झाले आहे किंवा नाही याची खातरजमा करण्याची तसदी रायगड जिल्हा खनिकर्म अधिकारी घेत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे.


रायगड जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी लीजवर दिलेल्या आणि खाजगी अशा सर्व दगड खाणींना भेट देऊन आपल्या कार्यालयाने दिलेल्या परवानगी एवढेच उत्खनन झाले आहे किंवा कसे हे पाहणे अत्यावश्यक आहे. एखाद्या खनिज उत्खनन करणाऱ्या जागा मालकाने दहा हजार ब्रास दगडाची रॉयल्टी भरली असेल आणि ती रॉयल्टी संपल्यानंतर पुन्हा रॉयल्टी भरण्यासाठी अर्ज दाखल केला असेल तर पुन्हा रॉयल्टी भरण्याची परवानगी देण्यापूर्वी दिलेल्या परवानगी एवढेच उत्खनन झाले आहे किंवा कसे हे जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी स्वतः किंवा त्यांच्या हाताखाली काम करणार्‍या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, असे जिल्ह्यात कुठेही होताना दिसत नाही.

भरलेली रॉयल्टी संपली असे दाखवून खाण मालक पुन्हा रॉयल्टी घेण्यासाठी अर्ज दाखल करतात आणि भरलेल्या रॉयल्टी एवढेच उत्खनन झाल आहे किंवा नाही हे न तपासता जिल्हा खनिकर्म अधिकारी व तत्सम आधिकारी संबंधित खाण मालकाला परवानगी देऊन मोकळे होतात. जिल्हा खनिकर्म अधिकारी किंवा त्यांच्या हाताखालील काम करणारे अधिकारी लीजवर दिलेल्या जागांना भेटी देऊन कधीही खाणींची मोजणी करत नाहीत.

अगदी एखाद दुसरे खाण्याची मोजणी करता रायगड जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या या मुजोर प्रवृत्तीमुळे रायगड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर गौण खनिज उत्खननाची चोरी वाढली आहे. वास्तविक पाहता दगड खाणीतील उत्खनन हे काय आठ पंधरा दिवसात किंवा महिन्या दोन महिन्यात झालेले नाही. हे निरंतर प्रक्रिया सुरू असते. दगड खाणीतून सतत दगड काढला जातो. परंतु, एकदा विशिष्ट प्रकारची परवानगी घेतल्यानंतर ती परवानगी संपल्यावर पुन्हा परवानगी घेण्याची त्या मालकाला गरज असते. मात्र लाखो ब्रास दगडाची चोरटी वाहतूक खुलेआम बेकायदेशीर चाललेल्या दगड खाणीतून चालू आहे.

राज्य शासनाचा महसूल मात्र करोडो रुपयाचा बुडत आहे. पण पोलिस प्रशासन या बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांकडून मात्र मोठी रक्कम वसूल करून स्वतःची झोळी भरण्याचे काम करत आहे.


रायगड जिल्ह्यात सर्व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दगडाचे उत्खनन होत आहे. दगड खाणीतून उत्खनन करणारा व एवढ्या मोठ्या रकमेची गौण खनिजाची चोरी करणारा एकटा माणूस करू शकतो का हा संशोधनाचा विषय आहे. जर एवढी रॉयल्टी एकट्या माणसाने बुडवले असेल तर त्याने नेमके उत्खनन किती केले व रॉयल्टी किती भरली हा सर्वसामान्य माणसाला भेडसावणारा प्रश्न आहे. जर त्याने रॉयल्टी बुडवली असेल तर त्यातून झालेला भ्रष्टाचार किती? एवढे मोठे रॉयल्टी चोरी अधिकारी आणि महसूल कर्मचारी यांच्या नजरचुकीने घडते की आशीर्वादाने? जर आशीर्वादाने घडत असेल तर त्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना नेमका किती फायदा झाला हा प्रश्न अनुत्तरित राहतो. जर चुकीने घडले असेल तर अधिकारी आणि कर्मचारी रायगड जिल्ह्यात झोपा काढतात काय? असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे.


दक्षता पथकाची गाडी नेमकी फिरते कुठे
रायगड जिल्हा खनिकर्म अधिकारी व जिल्हा दक्षता पथक हे कारवाईच्या नावाखाली गाड्या घेऊन फिरत असल्याचे कागदोपत्री दाखवले जाते. मात्र त्यांच्या गाड्या नेमक्या कुठे फिरतात? जर त्यांच्या गाड्या फिरत असत्या तर मोठ्या प्रमाणात दगड चोरी होत असताना दक्षता पथकाला चोरीचा आणि दगड-माती नेणाऱ्या किती गाड्या सापडतात आणि किती गाड्यांना दंड लावला जातो हा मोठा प्रश्न आहे. दक्षता पथकातील अधिकारी आणि कर्मचारी छोट्या-मोठ्या वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना पकडून व स्थानिक लोकांकडून चालवल्या जाणाऱ्या छोट्या दगडखाणी त्यांना भेट देतात, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करताना दिसतात. मात्र, मोठ्या दगड खाणींमध्ये असे अधिकारी आणि कर्मचारी चुकून देखील फिरत नाहीत.

रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा या तालुक्यातील बहुतांशी गावे व डोंगर नैसर्गिक आपत्ती योजनेअंतर्गत येतात. त्या ठिकाणी पावसाळ्यात भूस्खलन होण्याची परिस्थिती असतानाही त्या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर दगड उत्खनन होत आहे. त्याठिकाणी मात्र हे कर्मचारी कधीही जात नाही. अथवा त्यांच्याकडून पकडलेल्या गाड्यांना दंड देखील लावण्याचा प्रयत्न हे अधिक अधिकारी करत नाही. रायगड जिल्ह्यात मागील 10 वर्षात दक्षता पथकाने व खनिकर्म विभागाने किती अनधिकृत गाड्या पकडल्या व त्यांच्यावर कोणती कारवाई केली हा संशोधनाचा विषय आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here