@maharashtracity

ठेका रद्द करुन संबंधितांची चौकशी करण्याची नगरसेवकांची मागणी

धुळे: धुळे महापालिकेत डास निर्मूलन ठेक्यात सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा घणाघाती आरोप सत्ताधारी पक्षातील नगरसेवक शीतल नवलेंनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केला. हा ठेका रद्द करुन संबंधितांविरुध्द कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. शिवाय, अस्वच्छता, रस्ते दुरुस्तीचा मुद्दाही सभेत गाजला.

महापालिकेच्या सभागृहात मंगळवारी प्रभारी सभापती नागसेन बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य शीतल नवले, सुनिल बैसाणे, अमोल मासुळे, अमिन पटेल, किरण कुलेवार आदींसह विविध विभागांचे अधिकारी तसेच डास निर्मूलन ठेकेदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सभेच्या अजेंड्यावर एकूण १२ विषय ठेवण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीलाच शीतल नवले यांनी अगोदर डेंग्यूचा विषय घ्यावा, अशी मागणी करत डास निर्मूलनाच्या ठेक्यात कशा पध्दतीने भ्रष्टाचार होत आहे याचा पाढा वाचला.

या ठेक्यात थोडे-थाडके नव्हे तर तब्बल १ कोटी ३० लाखांचा भ्रष्टाचार प्रशासनाने केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. फवारणी करणार्‍या कर्मचार्‍यांची रोज बायोमॅट्रीक हजेरी होते काय? यासह विविध प्रश्‍न उपस्थित केले.

नवले म्हणाल्या, डास निर्मूलनासाठी ठेका दिला तेव्हा ठेकेदाराला प्रति महिना ३९ लाख ६० हजार ८२५ रुपये देण्याची मंजुरी दिली होती. त्यानुषंगाने वार्षिक ४ कोटी ७५ लाख ९०० रुपये तर तीन वर्षाला १४ कोटी ८९ लाख ७०० रुपये इतका दर आपण मर्यादीत केला होता.

त्या पुढे म्हणाल्या, या किमतीच्या वर हा ठेका जायला नको होता. मात्र, करारनाम्याप्रमाणे मासिक दरात पुढील प्रत्येक वर्षी नैसर्गिक वाढ १० टक्के देण्यात यावी, अशी दिशाभूल करणारी टिपणी प्रशासनाने सभागृहासमोर ठेवली आहे.

ही दरवाढ कोणाला विचारुन केली? केवळ एक ओळ समाविष्ट करुन १ कोटी ३० लाखांचा भ्रष्टाचार आरोग्य विभागाने केलेला आहे. यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करतानाच नवले यांनी ठेका रद्द करण्याची मागणी केली. तसेच चुकीचे करारनामे करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणीही केली.

देवपूरातील रस्ते दुरुस्तीसाठी मनपाकडे पैसे नाहीत. मात्र, भ्रष्टाचार करायला दीड-दीड कोटी रुपये आहेत. कोण-कोण या भ्रष्टाचारात सामील आहेत? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

या प्रश्‍नांची उत्तरे जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत सभागृहातच उपोषणाला बसण्याचा इशारा नवले यांनी दिला. डास निर्मूलनाचे काम प्रामाणिकपणे होत नसल्याने आपल्या प्रभागात डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.

दरम्यान, यावर तीन दिवसात चौकशी करुन अहवाल सादर करावा व विशेष सभा घ्यावी, असे आदेश प्रभारी सभापती नागसेन बोरसे यांनी प्रशासनाला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here