@maharashtracity
२ मे २०१८ पासून कामाला सुरुवात होऊन अद्यापही ४०% काम पूर्ण
कामात फेरबदल केल्याने कंत्राट रकमेत ५१.३८ कोटींची वाढ
कंत्राटदार, सल्लागाराला दुप्पट बिदागी
कंत्राट मुदतीत २ वर्षांची वाढ, १ ऑक्टोबर २०२२ होणार काम पूर्ण
मुंबई: मध्य रेल्वेच्या विक्रोळी रेल्वे फाटक (Vikhroli Railway bridge) येथे पादचाऱ्यांचे अपघात टाळण्यासाठी पालिकेने कंत्राटदारामार्फत हाती घेतलेल्या उड्डाणपुलाचा (flyover) खर्च ३७ कोटींवरून थेट ८८ कोटींवर गेला असून मुदत कालावधीत २ वर्षांनी वाढ झाली आहे. त्यामुळे हा पूल पूर्ण होऊन पादचाऱ्यांना त्याचा वापर करण्यासाठी १ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वाट बघावी लागणार आहे.
यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. पुलाच्या कंत्राट खर्चात झालेली ५१ कोटींची वाढ झाल्याने व काम रखडून कालावधीत २ वर्षांची वाढ झाल्याने पालिकेतील पहारेकरी भाजप (BJP) व विरोधी पक्षाकडून सत्ताधारी शिवसेनेला (Shiv Sena) आणि पालिका प्रशासनाला फैलावर घेऊन जाब विचारला जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
विक्रोळी रेल्वे स्थानक येथे पूर्व व पश्चिम विभागात पादचाऱ्यांना ये – जा करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे फाटकामधून जीवघेणा प्रवास करावा लागत असे. त्यामुळे अनेक पादचाऱ्यांचे अपघात होऊन अनेकजण त्यात कमी – अधिक प्रमाणात जखमी झाले तर काही जणांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला.
या ठिकाणी पादचाऱ्यांचे अपघात टाळण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याची मागणी अनेक राजकीय पक्ष, नागरी संघटना, सामाजिक संस्था यांनी पालिकेकडे अनेकदा मागणी करूनही त्याकडे लक्ष दिले जात नव्हते. अखेर २ मे २०१८ रोजी या पुलाचे काम हाती घेण्यात आले होते.
हे काम १८ महिन्यात पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, सल्लागाराने त्या पुलाच्या कामात ऐनवेळी काही बदल सुचविल्याने कामाची व्याप्ती वाढली. खर्चात तब्बल ५१ कोटीं रुपयांची वाढ झाली. या कामात पीएससी गर्डर ऐवजी स्टील गर्डर वापरण्यात येणार आहेत. तसेच पुलाचे काम जलद करण्यासाठी बांधकामाच्या सुपरस्ट्रक्चरच्या डिझाईनमध्ये आमूलाग्र बदल सुधारित तांत्रिक कार्यपद्धतीने करणे या कारणांमुळे पुलाच्या कंत्राट खर्चात व सल्लागाराच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे पुलाचा कंत्राट खर्च ३७ कोटी वरून ८८ कोटींवर गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत फक्त ४० टक्के एवढेच काम झाले आहे. या पुलाचे काम आता १ ऑक्टोबर २०२२ रोजी पूर्ण होणार आहे.