@By विजय साखळकर

@maharashtracity

दाऊद ,शब्बीर हे दोघे भाऊ आणि अमिरजादा आणि आलमजेब यांंचा एकत्रीत कारभार सुरू झाला आणि या नव्या दमाच्या चौघांचा आरंभी डोंगरी, माझगाव, पायधुनी आदी भागात दबदबा निर्माण होत गेला. काही दिवसांतच त्यांच्या अवतीभवती त्या परिसरातील आणखीही काही मंडळी सामील झाली. त्यांना दाऊद (Dawood), शब्बीर (Shabbir) आणि अमिरजादा – आलमजेब यांच्यासारखा चेहरा नव्हता. पण ‘येस हुजूर’ म्हणण्याइतकी त्यांचीही कर्तबगारी होती. या चौघांच्या सिंडिकेटनं काम सांगायचं आणि बाकीच्यांनी त्याची तामिली करायची असा खाक्या होता.

आणीबाणीच्या काळात हाजी मस्तानची (Haji Mastan) संपत्ती जप्त झाली होती आणि ती परत मिळवण्यासाठी त्याची न्यायालयीन लढाई सुरू होती. असं म्हटलं जातं की त्याच काळात काही दिवस दाऊद मस्तानकडे नोकरीला होता आणि मस्तानच्या नकळत काही लाखांचा घपला करून दाऊदनं मस्तानकडून फारकत घेतली.

या चौघांनी मिळून जे धारिष्ट्य केलं, बॅंकेची कॅश लुटायचं ते गैरसमजुतीपोटी. त्यांच्या खबऱ्याकडून (khabri) त्यांना माहिती मिळाली की मस्तानचा पैसा हलवला जाणार आहे. म्हणून त्यांनी सापळा रचला आणि गाडी लुटली. दहा पंधरा लाख म्हणजे मस्तानच्या दृष्टीने ‘दर्या मे खसखस’. त्यामुळे याची तक्रार वगैरे करण्याच्या फंदात तो पडणार नाही, अशी त्यांची धारणा होती. मस्तानचा असा अनुभव त्यांना याआधीही आला होता. पण इब्राहिम कासकरच्या (Ibrahim Kaskar) जागरूकतेमुळे ते रंगेहात उचलले गेले.

बॅंक कॅशलुटीच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर या चौकडीच्या कारवायांना अधिक वेग आला. या परिसरात अनेक बेकायदा उद्योग चालायचे आणि त्याची इत्यंभूत माहिती या चौकडीला मिळत असायची. त्या व्यवसायातून मिळणाऱ्या लाभात या चौकडीनं आपला सुरक्षा खंडणीचा (Protection money) वाटा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे या चौकडीचे साम्राज्य वाढत गेले. दर महिन्याला काही लाखाची बेगमी होत असायची आणि हा खर्च वजा जाता चौघात वाटली जात असायची.

हा खर्च कसला?

आपल्या परिसरातील गल्लीकुचीतील माहिती मिळवण्यासाठी या चौकडीनं खबऱ्यांची (Informer) फौज पाळली होती. त्यांना खबरी आणण्यासाठी खुश ठेवावे लागत असे आणि त्यासाठी त्यांचा खिसा सतत गरम ठेवावा लागत असे. या चौकडीतही दाऊद- शब्बीर यांच्या नेटवर्कमध्ये जास्त खबरे होते आणि त्यांच्या सरबराईवर कंपनीचा जास्त पैसा खर्च होत असे. त्यामुळे हे दोघे भाऊ आपल्याला चुना लावून कंपनीतल्या पैशावर डल्ला मारत असावेत अशी शंका आमिरजादा (Amirjada) व आलमजेब (Alamjeb) यांच्या डोक्यात निर्माण झाली. मग तशा चर्चेला सुरुवात झाली.

काहीवेळा ही चर्चा अती ताणली जात असे. त्याचा परिणाम या चौकडीत एकमेकांविषयी असंतोष निर्माण करण्यास कारणीभूत होत गेली.

याच काळात. एका प्रकरणात दाऊद आणि शब्बीर पोलिसांच्या (Mumbai police) हाती रंगेहात सापडले. ते गजाआड झाले. त्या काळात संपूर्ण धंदा आलमजेब- आमिरजादा यांनी ताब्यात घेतला.

दाऊद- शब्बीर बाहेर आले आणि त्यांनी हिशेब मागितला असता तो देण्यास आमिरजादा- आलमजेब यांनी नकार दिला. त्यामुळे एकत्र सुरू झालेल्या या व्यवसायाची दोन शकले झाली आणि दोघांच्या वेगळ्या कंपन्या सुरू झाल्या.

त्यांच्या कंपन्यांचे स्रोत एकच असल्याने त्यांच्यात संघर्ष अटळ होता. तो सुरू झाला. त्या परिसरात एक वर्तमानपत्र सुरू झाले. त्या वर्तमानपत्रातून सर्रास दाऊद आणि शब्बीरच्या कारनाम्यांची माहिती प्रकाशित होत असे. त्यामुळे दोघांनाही वारंवार पोलीस ठाण्यातून चौकशीसाठी बोलावले जात असे. परिणामी वेळ वाया जात असे आणि पैसाही खर्च होत असे.

दाऊदनं एकदोनदा त्या संपादकाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करून पाहिला. इकबाल नातिक हे त्या संपादकाचे नाव. आपल्याविरोधात न लिहिण्यासाठी त्याला दरमहा काही रक्कम देण्याचेही आमिष दाखविले. पण तो बधत नव्हता. तेव्हा दाऊदनं कौवे लावून इकबाल नातिकचा बोलविता धनी कोण असू शकेल याची माहिती काढण्यास सुरूवात केली.

प्रत्यक्ष माहिती मिळाली तेव्हा त्याला आमिरजादा,आलमजेब यांनी विकत घेतले असल्याचे दाऊदला कळले आणि या टोळीतील संघर्ष शिगेला पोहोचला.

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगातचे वार्तांकन केले आहे. त्यांना ७०२१८०१९३९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here