@maharashtracity

मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (public health department) आठवडा अहवालानुसार राज्यात २.२८ टक्के म्हणजेच ४ हजार ७२७ गंभीर रुग्ण आहेत. या गंभीर रुग्णांपैकी १.०६ टक्के २ हजार १९३ रुग्ण आयसीयूत उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले.

तसेच ०.३९ टक्के म्हणजे ८०५ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. तर ०.६७ टक्के २ हजार ५३४ रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. गंभीर रुग्ण संख्येमुळे मृत्यू वाढण्याची शक्यता असल्याची भीती कोविड मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे (Dr Avinash Supe) यांनी व्यक्त केली.

राज्यात सध्या सक्रिय रुग्ण २ लाख ७ हजार ३५ असून यातील ७.१५ टक्के म्हणजेच १४ हजार ८१९ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी १ लाख ९२ हजार ५३१ म्हणजे ९२.८५ टक्के लक्षणविरहित आणि सौम्य लक्षणांचे रुग्ण असल्याचे आठवडा अहवाल सांगतो.

तर २२ ते ३१ जानेवारी या दहा दिवसाच्या कालावधीत गंभीर रुग्ण, आयसीयु रुग्णांची टक्केवारी वाढती आहे. २२ जानेवारी रोजी गंभीर रुग्णांची टक्केवारी २.२१ टक्के म्हणजेच ६ हजार १७५ एवढी रुग्णसंख्या होती. तर दहाव्या दिवशी ३१ जानेवारी रोजी ४ हजार ७२७ गंभीर रुग्ण म्हणजेच २.२८ टक्के एवढी होती.

राज्यातील गंभीर रुग्ण संख्येवर बोलताना कोरोना मृत्यू विश्लेषक समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले कि, राज्यात गंभीर रुग्ण अजूनही ५ हजाराच्या संख्येत आहेत. यातून मृत्यू वाढण्यची शक्यता आहे. मुंबई व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील मृत्यू दर थोडासा वाढला आहे. याला कारण या ठिकाणी रुग्ण संख्या वाढत असल्याची शक्यता आहे.

मुंबईत रुग्ण कमी झाले असले तरी राज्यात इतर ठिकाणी रुग्ण वाढतानाच दिसून येत आहेत. यात सक्रिय रुग्णांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे मृत्यू दर वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच लाट नियंत्रणात येत असल्याचे चित्र असले तरीही गंभीर रुग्ण संख्या असल्याने अजूनही सतर्क राहण्याची गरज असल्याचे डॉ. सुपे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here