@maharashtracity

राज्य वैद्यकीय उपसमितीचा निर्वाळा

मुंबई: कोविड लसीकरणामुळे ‘त्या’ १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झालेला नसल्याचा निर्वाळा वैद्यकीय तज्ञांच्या राज्‍यस्‍तरीय उपसमितीने दिला आहे.

दिनांक १४ जानेवारी २०२२ रोजी एका व्यक्तीने ट्वीटरवर, १५ वर्षीय मुलीचा लसीकरणामुळे मृत्यू झाला अशी चुकीची बातमी प्रसारित केली होती. यानंतर या बातमीची सखोल तपासणी करून अहवाल बनवण्यात आला.

लसीकरणानंतर (vaccination) घडणार्‍या प्रतिकूल घटनांची चिकित्‍सा करण्‍यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार वैद्यकीय तज्ञांची राज्‍यस्‍तरीय उपसमिती (state level subcommittee), मुंबई विभाग नेमण्यात आली आहे. या समितीची बैठक सोमवारी, १७ जानेवारी रोजी झाली. या घटनेचा अहवाल समिती समोर सादर करण्‍यात आला. त्या मुलीचा मृत्‍यू लसीकरणामुळे झाला नाही, असे स्पष्ट मत समितीने दिले आहे.

१५ ते १७ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड लसीकरण मुंबईत ३ जानेवारीपासून सुरू केले आहे. यात, मुंबईतील महानगरपालिका (BMC), सरकारी आणि खासगी कोविड लसीकरण केंद्रांवर (private vaccination centres) आतापर्यंत १,४७,९४४ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार या वयोगटासाठी फक्त कोवॅक्सिन लसीचा (covaxin) वापर केला जात असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here