@maharashtracity

बेस्टची महिलांना भाऊबीज भेट

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने मुंबईतील महिलांसाठी शनिवारपासून म्हणजे भाऊबीजेच्या दिवशीच ‘लेडीज फर्स्ट लेडीज स्पेशल’ बसगाड्यांच्या सेवेचे लोकार्पण महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्या हस्ते दादर, प्लाझा येथे करण्यात आले. (Ladies special BEST service inaugurated)

त्यामुळे मुंबईतील महिलांना एकप्रकारे ‘भाऊबीज भेट’ देण्यात आली आहे. याप्रसंगी, उपमहापौर सुहास वाडकर, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर व बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, बेस्टचे वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या बससेवेमुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. तसेच, बेस्ट उपक्रमाने महिलांसाठी सुरू केलेल्या या विशेष बससेवेचे महापौर, उपमहापौर यांनी स्वागत केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, महिला प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी भाऊबीज निमित्ताने महिला प्रवाशांना अनोखी भेट देत १०० ‘लेडीज फर्स्ट लेडीज स्पेशल’ (Ladies First Ladies Special) दिनांक ६ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचे आदेश बेस्ट उपक्रमाला दिले होते.

त्यानुसार, बेस्टद्वारे २७ बस आगारातून मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील १०० बस मार्गावर ‘लेडीज फर्स्ट लेडीज स्पेशल’ बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. आज काही ठिकाणी महिलांसाठी ही विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.

सध्या शहरातील विविध मार्गावर बेस्टच्या ३७ महिला स्पेशल बस धावतात. त्यात या १०० बसची भर पडल्यामुळे एकूण महिला स्पेशल बसची संख्या १३७ हाेणार आहे. यामुळे गर्दीच्या वेळेस महिला प्रवाशांना माेठा दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here