@maharashtracity

मुंबई: बेस्ट (BEST) उपक्रमाने खर्चात बचत करण्यासाठी बेस्ट बसगाड्यांच्या टपावरील भागात सौरउर्जेचे पॅनल (Solar Panels) लावण्यात यावे, अशी मागणी एम/ पश्चिम विभागातील वार्ड क्रमांक १५२ मधील भाजपच्या नगरसेविका आशा मराठे यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे केली आहे.

बेस्ट उपक्रमाची बससेवा ही मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रम विशेषतः बेस्ट परिवहन विभाग हा कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू आहे. केवळ जनसेवा म्हणून बेस्ट उपक्रम नागरिकांना बससेवा पुरवीत आहे. या बससेवेबरोबरच बेस्ट उपक्रम विद्युत विभागामार्फत शहर भागातील वीज ग्राहकांना माफक दरात वीज पुरवठा करीत आहे.

तर दुसरीकडे जगभरात अनेक देशात, अगदी भारतातही सौर ऊर्जेचा वापर इलेक्ट्रिक विजेला पर्याय म्हणून केला जात आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमानेही आपल्या प्रशासकीय खर्चात बचत व्हावी, पर्यावरण संतुलन राखले जावे म्हणू निसर्गदत्त देणगी लाभलेल्या सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात करणे ही आज काळाची गरज झाली आहे. यासाठीच बेस्ट उपक्रमानेसुद्धा आपल्या बसगाड्यांमध्ये विजेने भारीत बॅटरीचा वापर करणे खर्चिक आहे.

त्या तुलनेत, जर बेस्टने सौरऊर्जेचा वापर केल्यास बेस्टच्या प्रशासकीय खर्चात मोठी बचत होण्यास मदत होईल. त्यासाठी बेस्ट बसगाड्यांच्या टपावरील भागात सौरउर्जेचे पॅनल लावण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका आशा मराठे (BJP Corporator Asha Marathe) यांनी केली आहे.

या संदर्भातील ठरावाची सूचना, महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्या सहमतीने पालिकेच्या आगामी महासभेत मंजुरीसाठी येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here