@maharashtracity

भाजपचा सभात्याग

रस्ते कामांत त्रूटी आढळल्यास होणार कारवाई

रस्ते कामांचे थर्टीपार्टी ऑडिट करण्याचे आदेश

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC polls) तोंडावर पालिका प्रशासनाने रस्ते दुरुस्ती, सुधारणा करण्यासाठी सादर केलेले १ हजार ७२० कोटी रुपयांचे ३९ प्रस्ताव भाजपच्या (BJP) विरोधाला न जुमानता स्थायी समिती बैठकीत बहुमताने मंजूर करण्यात आले.

यावेळी, कमी दरात काम केल्यास रस्ते कामांचा दर्जा खराब होईल, अशी शंका उपस्थित करून यापूर्वीच्या रस्ते कामांचा अहवाल देण्याची मागणी करणारा भाजप एकाकी पडला. सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व समाजवादी पक्षांनी (Samajwadi Party) बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केले.

त्यामुळे भाजप सदस्यांनी सत्ताधारी पक्ष व पालिका प्रशासन यांचा निषेध व्यक्त करीत सभात्याग (walk out) केला.

पालिका प्रशासनाने रस्ते कामांचा दर्जा व गुणवत्ता राखण्यावर काटेकोरपणे लक्ष द्यावे. तसेच, रस्ते कामाचे ‘थर्टीपार्टी ऑडिट’ (Third Party Audit) करावे. जर रस्ते कामात काही त्रूटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी पालिका प्रशासनाला दिले.

Also Read: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेने केला निषेध

मुंबईतील रस्ते कामांचे कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मागील वेळी सादर केले गेले. त्यावेळी रस्ते कामे ३०% कमी दरात केल्यास रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होतील, असा आक्षेप भाजपने घेतला होता. त्यामुळे रस्त्यांचे प्रस्ताव रखडले होते. आता पुन्हा एकदा पालिकेने रस्त्यांचे १,७२० कोटी रुपयांचे ३९ प्रस्ताव सोमवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आणले होते.

रस्ते कामासंदर्भातील पहिलाच प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पुकारताच, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांनी, त्यावर जोरदार आक्षेप घेतला.

कमी दराने आणलेल्या या प्रस्तावात रस्त्यांची लांबी रुंदी, किती चौरस मीटर खर्च, रस्त्यांची गुणवत्ता कोण तपासणार, याबाबत कोणतीही माहिती अंतर्भूत नसल्याचे सांगत समितीचे लक्ष वेधले. जोपर्यंत रस्ते कामांबाबत उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नाही, तोपर्यंत रस्त्यांचे प्रस्ताव मंजूर करू नयेत, अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी केली.

यावर विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी आधीच प्रस्ताव उशिराने आले आहेत. रस्त्यांची कामे वेळेत पार पाडायला हवीत. त्यामुळे प्रस्ताव मंजूर व्हायला हवेत. प्रस्ताव रखडले तर त्याचा रस्ते कामांवर परिणाम होईल. खड्डेमुक्त (Potholes free roads) व दर्जेदार रस्ते मुंबईकरांना मिळायला हवेत. रस्त्यांचे थर्डपार्टी ऑडिट व्हायला हवे असे सांगत प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली.

यावेळी, भाजपचे भालचंद्र शिरसाट (Bhalchandra Shirsat) यांनी रवि राजा यांच्या मागणीला विरोध केला. मात्र निवडणुका असोत वा नसोत रस्त्यांची कामे झाली पाहिजे. प्रशासनाने रस्ते कामांबाबत समाधानकारक उत्तरे दिल्याशिवाय प्रस्ताव मंजूर करू नयेत, अशी मागणी लावून धरली.

त्यावर, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख (Raees Shaikh) यांनी रस्ते कामांचा प्रस्ताव उशिराने मंजुरीला आणणाऱ्या संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी निवडणूक तोंडावर आलेली असताना रस्त्यांची कामे रखडल्यास मतदारांना काय उत्तरे देणार, असे सवाल उपस्थित करीत रस्ते कामांचे सर्व प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली.

शेवटी प्रशासनातर्फे, अतिरिक्त आयुक्तांनी सदस्यांच्या सर्व मागण्या मान्य करून रस्त्याचा दर्जा राखण्यासाठी लक्ष देऊ, असे आश्वासन देत प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती समितीला केली. त्यानंतर अध्यक्ष यशवंत जाधव यांनी रस्त्याचा प्रस्ताव मंजूर करताच भाजपने सभात्याग केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here