@maharashtracity
धुळे: शेतकर्यांना (Farmers) उत्पादन खर्चावर आधारित फायदेशीर किंमत द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी भारतीय किसान संघाच्यावतीने (Bharatiya Kisan Sangh) बुधवारी क्युमाईन क्लबजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किंमतीच्या फसवेगिरीचा किसान संघाने निषेध केला.
या आंदोलनात किसान संघाचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव बागुल, साहेबचंद जैन, दुर्लभ जाधव, उमेश चौधरी, प्रभाकर चौधरी, उत्तम तापडे, प्रशांत अहिरे, मधुकर वाघ, रामराव गवळे, सुहास खलाणे, ईश्वर माळी, रविंद्र जाधव, मोहन सुर्यवंशी, समाधान पाटील, वना माळी आदी सहभागी झाले होते.
भारतीय किसान संघाने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतमालाला उत्पादन खर्चावर लाभकारी मूल्य देण्यासाठी देशात कायदा करण्यात यावा, अशी मागणी भारतीय किसान संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पंतप्रधानांकडे केली होती.
मात्र सरकार घोषित करीत असलेल्या आधारभूत किंमतीतून (MSP) शेतकर्यांना कुठलाही लाभ मिळणार नाही, असे दिसते. त्यामुळे शेतकर्यांना किमान आधारभूत रक्कम नाही तर उत्पादन खर्चावर आधारित फायदेशीर किंमत द्यावी, एकदा घोषित केलेल्या फायदेशीर किमतीत (लाभकारी मूल्य) वेळोवेळी महागाईनुसार समायोजन करून त्या प्रमाणात वितरण करावे, शेतकर्याचे उत्पादन बाजार समितीत, बाजार समितीच्या बाहेर किंवा सरकारने खरेदी केले तरी घोषित केलेल्या फायदेशीर किमतीवर विकले जाईल, घोषित किमतीपेक्षा कमी किमतीस व्यवहार झाल्यास तो अपराध मानण्यात येईल.
कठोर कायदा बनविला तरच वरील गोष्टी साध्य करणे शक्य आहे. यामुळे सरकारने उत्पादन खर्चावर आधारित फायदेशीर किंमतीसाठी कायदा करावा, अशी मागणी भारतीय किसान संघाने केली आहे.