@maharashtracity

पोलीस प्रशासनासह नागरिकांनी जाणून घेतली वेगवेगळी महिती

धुळे: मशिदीविषयी (Mosque) असलेले गैरसमज दूर करण्यासह हिंदू-मुस्लिम समाजातील (Hindu-Muslim unity) लोकांमधील दरी दूर करणे, दोन समाजात सलोखा निर्माण करणे, तेथे सुरु असलेले नवनवीन सकारात्मक उपक्रम याबाबत माहिती देण्यासाठी रविवारी लोकसेवा ग्रुपतर्फे मशिद परिचय हा स्तूत्य उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी पोलीस प्रशासनातील अधिकार्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांनीही मशिदीला भेट देत तेथे सुरु असलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती जाणून घेतली. अन्य लोकांनीही अशा विविध मशिदींना भेटी देऊन माहीती जाणून घ्यावी, असे आवाहन लोकसेवा ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

मुस्लिम समाजातील लोकांसाठी अतिशय पवित्र मानले जाणारे प्रार्थना स्थळ म्हणजे मशिद. मशिद म्हटले की विविध समाजातील लोकांना अनेक गैरसमज आहेत. तेथे केवळ मुस्लिम समाजातीलच लोक जाऊ शकतात, महिलांना तेथे जाण्यास मनाई आहे, तेथे आजान (Azan) कशी चालते, नमाजमध्ये (Namaz) काय शिकविले जाते, तेथे काही गैरप्रकार चालतात का, असे अनेक प्रश्‍न लोकांच्या मनामध्ये आहे.

यामुळे मशिदीमध्ये जाऊन ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी लोकसेवा ग्रुपतर्फे मसूद अन्सारी यांनी मशिद परिचय हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्या निमीत्ताने मशिदीचा परिचय करुन घेण्यासाठी रविवारी पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पोलीस कर्मचारी कबीर शेख, महापालिकेचे स्थायी समिती सभापती संजय जाधव, मनपा सचिव मनोज वाघ, काँग्रेसचे कैलास कोळवले, माजी नगरसेवक गोविंद साखला, व्यापारी दीपक जैन आदी लोकांनी तहसिलदार कचेरीसमोरील नगिना मशिदीला (Nagina Masjid) भेट दिली.

मौलाना (Maulana) मुख्तार महमद व मुफ्ती सय्यद कासम जिलानी या धर्मगुरूंनी मशिदीत सुरु असलेल्या कुराण (Quran) पठण, शैक्षणिक उपक्रम, वजू (Wudu) करणे म्हणजे मशिदीत जाताना स्वतःला स्वच्छ करणे, दिवसभरातून फजर, जोहर, असर, मगरीब आणि ईशा अशा पाच प्रकारच्या आजान करणे, महिलांना मशिदीत प्रवेशाची पध्दत, आजानमध्ये असलेल्या वेगवेगळ्या शब्दांची माहीती, नमाजला बसण्याची विशिष्ट पध्दती अशा प्रकारची निरनिराळी माहीती उपस्थितांना दिली. यावेळी सुमारे शंभरहून अधिक लोकांनी मशिदीत जाऊन मशिदीचा परिचय करुन घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here