@maharashtracity

धुळे: येथील जयहिंद शैक्षणिक संस्थेत बनावट दस्तऐवजाव्दारे शिक्षक आणि शिक्षिकेची नेमणूक करीत संस्था आणि शासनाची फसवणूक  केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने जयहिंद संस्थेचे चेअरमन, व्हाइस चेअरमनसह 17 जणांवर देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

संस्थेचे सभासद भरत सुरेंद्र पाटील (वय 58 रा. प्लॉट नं. 24, जयहिंद कॉलनी, देवपूर) यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. चौकशीअंती न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

भरत पाटील यांच्या फिर्यादीनुसार, देवपूरातील जयहिंद सिनियर कॉलेजमध्ये चेअरमन डॉ. अरूण झुलाल साळुंखे, व्हा. चेअरमन प्रमोद गुलाबराव पाटील, संचालक प्रदीप हिराजी भदाणे, सुधील सुभाषचंद पाटील, संचालिका तथा नगरसेविका सौ. प्रतिभा शिवाजीराव चौधरी, चंद्रशेखर व्यंकटराव पाटील, अजित सुखदेव मोरे, शेखर रामदास सुर्यवंशी, डॉ.अनिल दिगंबर चौधरी, डॉ. निलीमा हिंमतराव पाटील, स्मिता सुधाकर साळुंखे, वसंतराव ओंकार ईशी, नानाभाऊ राजसिंह कोर, तत्कालीन मुख्याध्यापक एस.आर.चौधरी, प्राचार्य डॉ. पंजाबराव पवार, शिक्षक प्रभाकर रोहिदास चौधरी, शिक्षिका मिना संजय पाटील सर्व (रा.धुळे) यांनी कट कारस्थान रचले.

शासन व संस्थेची जाणीवपुर्वक फसवणूक करण्याच्या हेतूने व उद्देशाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खोटे व बनावट दस्तऐवज तयार केले. त्याआधारे प्रभाकर चौधरी व मीना पाटील या संशयित आरोपींचा नेमणुकीचा प्रस्ताव नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालकांकडे पाठवून त्यांची दिशाभूल करीत दोघांना मान्यता मंजुर करून घेतली. त्यांना संस्थेत रूजु करून घेवून संस्थेची व शासनाची फसवणूक केली. त्यावरून वरील 17 जणांवर भादंवि कलम 406, 415, 420, 468, 469, 471, 472, 120 ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल नोंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here