@maharashtracity

धुळे: शहरातील माजी आमदार तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते राजवर्धन कदमबांडे (Rajvardhan Kadambande) यांचे पुत्र यशवर्धन कदमबाडे यांनी बुधवारी थेट मातोश्रीवर जात उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाने धुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात होणार आहे.

राजवर्धन कदमबांडे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आहेत. ते गेले अनेक वर्ष राष्ट्रवादीत (NCP) सक्रीय होते. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राज्याचे विरोधी पक्षनेते अजीत पवार (Ajit Pawar) यांचे ते अतिशय निकटवर्तीय होते. मात्र, देशासह राज्यात मोदी लाट आल्यानंतर कदमबांडे यांनी आ. अमरिश पटेल यांच्यासोबत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला.

कदमबांडे यांचा पुत्र यशवर्धन (Yashvardhan Kadambande) हा देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक संघटनेत प्रदेश पातळीवर कार्यरत होता. तसेच त्याच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे प्रदेश प्रमुखपदही होते. महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi government) स्थापन झाल्यानंतर राजवर्धन यांची राष्ट्रवादीत घरवापसी होईल अशा वावड्या उठल्या होत्या, त्या फोल ठरल्या.

असे असताना बुधवारी अचानक यशवर्धन कदमबांडे हा शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश करणार असल्याचा संदेश समाज माध्यमांवर प्रसारीत झाला. या वृताला स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनीही दुजोरा दिला. तथापि, वडील राजवर्धन हे भाजपत गेल्यामुळे यशवर्धन हा गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणापासून अलिप्त होता. मात्र, बुधवारी त्याने अचानक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात (Uddhav Balasaheb Thackeray Party) प्रवेश केला. यशवर्धन कदमबांडे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपात असलेल्या राजवर्धन कदमबांडे यांच्या राजकीय वाटचालीस कुठेतरी अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

“राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना उध्दव ठाकरे यांनी खूप चांगले काम केले. त्यांनी कुटुंब प्रमुखाप्रमाणे महाराष्ट्राला सांभाळले. त्यांचा स्वभाव सोज्वळ आणि शांत आहे. शिवाय, कोविड काळात त्यांनी अतिशय चांगले काम केले. त्यांच्या कामाने मी प्रभावित झालो. यामुळे मी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. वडिल राजवर्धन हे भाजपत आहेत. तेथे ते प्रामाणिकपणे काम करीत आहेत.”

  • यशवर्धन कदमबांडे, धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here