By सचिन उन्हाळेकर
Twitter: @Sachin2
मुंबई: लालबाग येथील गुंदेचा गार्डन इमारतीचे गॅस कनेक्शन तोडण्याकरीता मुंबई अग्निशमन दलातर्फे पाऊले उचलली जाणार आहे. गॅस कंपनीनाही तसे मुंबई अग्निशमन दलातर्फे कळविण्यात येणार आहे.
शनिवारी पहाटे दरम्यान गुंदेचा गार्डन इमारतीत शॉर्ट सर्किटची घटना घडली होती. सुदैवाने कोणतेही दुर्घटना घडली नाही. घटनेनंतर मुंबई अग्निशमन दलातर्फे (Fire Brigade) इमारतीची पाहणी करण्यात आली. यावेळी येथे एक एलपीजी गॅसची टाकी आढळून आली. ज्यामध्ये गॅस जमा करुन पाईपलाईन द्वारे गॅस इमारतीच्या रहिवाश्यांना पुरविला जातो. प्रत्येक रहिवाश्यांना गॅस मीटर ही बसविण्यात आलेला आहे.
मात्र, येथे केवळ ५० गॅस सिलेंडरची परवानगी असताना येथे एलपीजीचे २१७ घरगुती आणि व्यावसायिक गॅस सापडले. याची गंभीर दखल घेत अग्निशमन दलाने घेत तातडीने एफ साऊथ वार्डमधील अधिकाऱ्यांना कळवून येथील एकूण १६७ गॅस जप्त करण्याची कारवाई केली.
तसेच गुंदेचा इमारतीमध्ये एक एलपीजी गॅस पाईपलाईनची परवानगी असताना येथे आणखी एक महानगर गॅसची पाईपलाईन बसविण्यात आलेली आहे. या पाईपलाईनला अनुमती देण्यात आलेली नसून याद्वारे पीनजी गॅसचा पुरवठा केला जात होतो.
एकाचवेळी दोन गॅसच्या पाईपलाईन (Gas pipeline) बसविण्यासची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे महानगर गॅसची लाईन त्वरित तोडण्यात यावी, याकरिता गॅस कंपनीला कळविण्यात येणार असल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांनी सांगितले.