@maharashtracity

श्री शहाजीराजे स्मारक अभिवृद्धी सेवा समितीला पहिल्या टप्प्यातील कामासाठी 5 लाखाचा धनादेश सुपूर्त

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे स्मारक समितीच्या सदस्यांशी साधला संवाद

बेंगलूरू: स्वराज्यसंकल्पक श्री. शहाजीराजे भोसले (Shahaji Raje Bhosle) यांच्या कर्नाटकातील जिल्हा दावणगेरे येथील होदिगेरेमध्ये असलेल्या समाधीस्थळाचा संपूर्ण जीर्णोद्धार (renovation) करण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. या समाधीस्थळाचा डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून जीर्णोद्धार करण्यात येईल असे जाहीर करत त्यांनी श्री शहाजी स्मारक अभिवृद्धी सेवा समितीचे अध्यक्ष मल्लेश शिंदे यांना आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.

शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील (Karnataka) दावणगेरे जिल्ह्यातील चेन्नागिरी तालुक्यातील होदिगेरे गावात असलेल्या समाधीस्थळाची अत्यंत दुरवस्था झाली असल्याची गंभीर बाब ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि कादंबरीकार विश्वास पाटील (Vishwas Patil) यांनी समाज माध्यमाद्वारे टाकलेल्या पोस्टमधून निदर्शनास आणून दिली होती. ही बाब राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीने विश्वास पाटील यांच्याशी संपर्क साधून या समाधीचा जीर्णोद्धार करण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यानुसार कर्नाटकमधील होदिगेरे या गावातील प्रत्यक्ष समाधीस्थळी भेट देऊन डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी श्री. शहाजीराजे स्मारक ट्रस्टला पहिल्या टप्प्यातील कामासाठी 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. यावेळी पानीपतकार विश्वास पाटील हे देखील उपस्थित होते.

यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्मारक समिती सदस्यांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. शहाजीराजे भोसले महाराजांच्या या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धाराची जबाबदारी आपण उचलत असून त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य करायला आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेली काही वर्षे स्मारक समितीच्या माध्यमातून त्यांनी या समाधीस्थळाचे केलेले जतन आणि संवर्धन याबद्दल स्मारक समितीचे अध्यक्ष मल्लेश शिंदे यांचे आभार मानले.

पहिल्या टप्प्यात दिलेली रक्कम घेऊन या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धार कामाला तातडीने सुरुवात करण्याची विनंती केली. तसेच स्मारक समितीच्या सर्व सदस्यांची लवकरच मुंबईत भेट घेण्याची तयारीही दर्शवली.

ज्येष्ठ लेखक कादंबरीकार विश्वास पाटील यांनी या समाधीस्थळाबाबत आपण लिहिलेल्या पोस्टची एवढ्या तातडीने दखल घेऊन त्याबाबत लगेच पावले उचलून स्मारक समितीला आर्थिक सहकार्य केल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचे आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आधी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न ज्यांनी पाहिले त्या शहाजीराजेंना महाराष्ट्र आजही विसरलेला नाही हेच या कृतीमधून सिध्द झाले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी बोलताना काढले.

यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे सदस्य मंगेश चिवटे व अन्य सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here