@maharashtracity
मुंबई: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत येणार्या साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी देवी (mahalaxmi temple) आणि श्री जोतिबा (Jotiba) देवस्थान येथील मंदिर प्रवेशासाठी भाविकांना ‘ई-पास’ (e – pass) सक्ती रहित करण्यात आली आहे. श्री जोतिबा देवस्थान येथील सर्व द्वारेही भाविकांसाठी खुली करणार असल्याचे देवस्थान समितीने घोषित केले आहे.
या देवस्थान प्रवेशासाठी ई-पास सक्ती होती. तसेच श्री जोतिबा देवस्थान येथील चारपैकी एकच द्वार भाविकांसाठी खुले होते. जोतिबा देवस्थान येथील मंदिरातील चारही द्वारे उघडून ‘ई-पास’ सुविधा बंद करावी, या मागणीसाठी जोतिबा डोंगर येथे 11 मार्चपासून धरणे आंदोलन चालू केले होते. या आंदोलनात हक्कदार पुजारी, गुरव समाज, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
दिनांक 12 मार्च या दिवशी या आंदोलनास हिंदु जनजागृती समितीसह (Hindu Janjagruti Samiti) कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही आंदोलनाची चेतावणी दिली होती. अखेर या आंदोलनाच्या रेट्यामुळे ‘ई-पास’ची सक्ती रहित करण्यात आली असून श्री जोतिबा देवस्थान येथील सर्व द्वारेही भाविकांसाठी खुली करणार असल्याचे देवस्थान समितीने घोषित केले आहे.
दिनांक 12 मार्च या दिवशी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलनास पाठिंब्याचे पत्र जोतिबा डोंगर ग्रामपंचायत सरपंच सौ. राधा बुणे यांना देण्यात आले होते. या वेळी शिवसेनेचे (Shiv Sena) कोल्हापूर उपशहरप्रमुख शशी बिडकर, हिंदुत्वनिष्ठ रामभाऊ मेथे, अधिवक्ता अमोल रणसिंग, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे आणि शिवानंद स्वामी, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे उपस्थित होते.
एकीकडे शासन सर्व खुले करतांना नाट्यगृहे, चित्रपटगृहे, कार्यालये यांसह जवळपास प्रत्येक ठिकाणी 100 टक्के उपस्थितीस अनुमती देत आहे. असे असतांना ‘ई-पास’ सक्तीची भूमिका अनाकलीय होती. यामुळे भाविकांची प्रचंड गैरसोय होत होती. ग्रामीण भागातून येणार्या भाविकांना प्रत्येक वेळी ‘ई-पास’ काढणे शक्य होत नसल्याने त्यांना दर्शनाविना रहावे लागत होते.
अखेर हिंदूंच्या रेट्यापुढे प्रशासनाला झुकावे लागले. मंदिरे ही हिंदूंसाठी चैतन्याचा स्रोत असल्याने यापुढील काळात तरी मंदिर प्रशासनाने भाविकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या निमित्ताने व्यक्त केली आहे.