एक वही एक पेन अभियानचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र
Twitter : @maharashtracity
मुंबई
सर्वाधिक शिक्षण घेवून समाजालाही शिक्षणाचा मूलमंत्र देणारे प्रकांड पंडित घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी शैक्षणिक साहित्याने अभिवादन करावे, असे आवाहन “एक वही एक पेन” अभियानाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेवून करण्यात आले.
समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून महामानवाला वह्या पेन पुस्तकांची मानवंदना हा उपक्रम मागील नऊ वर्षांपासून एक वही एक पेन अभियानाच्या माध्यमातून राबविला जातो. महापरिनिर्वाण दिन, महापुरुषांचे जयंती उत्सव तसेच गणेशोत्सवात देखील जनतेने शैक्षणिक जागर करून गरजू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन केले जाते. त्यानुसार महाराष्ट्रात ठिकठिकाणी या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला जातो, अशी माहिती या अभियानाचे प्रणेते जेष्ठ पत्रकार राजू झनके यांनी दिली.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले प्राथमिक माध्यमिक व उच्च शिक्षण घेतले. परदेशात जावून देखील त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून अनेक पदव्या संपादन केल्या. देशाला सर्वोच्च संविधान दिले. वंचित घटकांना आरक्षणाचा अधिकार दिला. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेवून कोलंबिया विद्यापीठाने जगातील सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून त्यांचा पुतळा विद्यापीठाच्या आवारात उभारला. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यावर मात करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत शिक्षणाची कास सोडली नाही. ते आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगले. समाजालाही त्यांनी शिक्षण घेण्याचा मूलमंत्र दिला. त्यामुळे त्यांना हार – फुले वाहून अभिवादन करण्यापेक्षा वह्या, पेन, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्याने अभिवादन करणे, हीच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली राहणार आहे. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांनी ही सूचना स्वीकारून समाजाला शिक्षणाप्रती सकारात्मक संदेश द्यावा, असे आवाहन झनके यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री व उद्योग मंत्री यांची भेट घेवून केली आहे.
६ डिसेंबर रोजी ठिकठिकाणी वह्या पेन पुस्तकांची मानवंदना द्यावी
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षणाचा मूलमंत्र अमलात आणण्यासाठी तसेच समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकविण्यासाठी आंबेडकरी अनुयायी, मंडळे, पक्ष, सामाजिक संघटनांनी ६ डिसेंबर या महापरिनिर्वाणदिनी दादर चैत्यभूमी, नागपूरच्या दीक्षाभूमीसह राज्यात ठिकठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वह्या पेन पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य अर्पण करून महामानवाला आदरांजली अर्पण करावी. जमा झालेले साहित्य समाजातील गरजू विद्यार्थ्यांना वितरीत करावे, असे आवाहन एक वही एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे. या अभियानात सक्रिय सहभाग तसेच सहाय्य करण्यासाठी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अभियानाच्या वतीने करण्यात आले आहे.