@maharashtracity

मुंबईत आणखीन काही ठिकाणी ‘चार्जिंग स्टेशन्स’ लवकरच

मुंबई: मुंबईमध्ये (Mumbai) वाहनांचे प्रदूषण (fuel pollution) कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment minister Aaditya Thackeray) यांच्या संकल्पनेमधून दादर (प.) येथील ‘कोहिनूर’मधील पालिकेच्या वाहनतळाच्या ठिकाणी मुंबईतील पाहिले इलेक्ट्रिक वाहन ‘चार्जिंग’ (e-Vehicle charging station) सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे.

मुंबई शहर व उपनगरात अन्य काही ठिकाणी अशीच इलेक्ट्रिक चार्जिंग केंद्रे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत, असे आश्वासन या चार्जिंग केंद्राचे उदघाटक आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना दिले आहे.

दादर (पश्चिम) कोहिनूर पे अँड पार्किंगच्या (Pay and Park) ठिकाणी यापुढे दररोज (२४ तासांमध्‍ये) साधारणपणे ७२ इलेक्ट्रिक वाहने चार्ज केली जाऊ शकतात. इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी १५ रुपये प्रती युनिट दर ठेवण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहनाला पूर्ण चार्ज होण्यासाठी २० ते ३० युनिट्स लागत असुन त्यासाठी २०० ते ४०० रुपयांपर्यत खर्च होणार आहे. अंदाजे चलन क्षमता (ड्रायव्हिंग रेंज) १४०-१७० किमी इतकी आहे.

याप्रसंगी, शिवसेना आ. सदा सरवणकर, आ. मनिषा कायंदे, स्थानिक नगरसेविका प्रिती पाटणकर, माजी महापौर व नगरसेविका श्रद्धा जाधव, जी/ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

“पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज

पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने ही आजच्या काळाची गरज बनली आहे. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरे येथील विविध सार्वजनिक वाहनतळांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. या अनुषंगाने इलेक्ट्रिक वाहनांची संख्या अधिक असलेल्या परिसरांमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग केंद्र सुरु करण्याचा प्राधान्यक्रम निश्चित करणे गरजेचे आहे. या दृष्टीने अभ्यासपूर्ण सर्वेक्षण करुन अधिकाधिक सार्वजनिक वाहनतळांच्या ठिकाणी चार्जिंग केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे आदेश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

एकाच वेळी ७ वाहनांची चार्जिंग सुविधा

मुंबईच नव्हे तर राज्यातील पहिल्या वाहन पार्किंग व चार्जिंगची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. या चार्जिंग स्टेशनमध्ये एकावेळी ७ इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यापैकी ४ ‘चार्जर’ हे जलद चार्जर असून, या प्रत्येक चार्जरद्वारे साधारणपणे एका तासात एक वाहन, याप्रमाणे एका तासात एकावेळी ४ वाहने ‘चार्ज’ करता येऊ शकतात. तर, या व्यतिरिक्त ३ चार्जर हे संथ चार्जर (स्लो चार्जर) या प्रकारातील असून, याद्वारे १ वाहन चार्ज करण्यास साधारणपणे ६ तासांचा कालावधी लागतो. या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी प्रती युनिट रुपये १५/- इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे चार्जिंग स्टेशन आठवड्याचे सातही दिवस २४ तास नागरिकांच्या सुविधेसाठी कार्यरत राहणार आहे, अशी माहिती या निमित्ताने सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here