@maharashtracity
ब्रीच कँडी हॉस्पिटल परिसरात ’लता दीदी अमर रहे‘ च्या घोषणा
शोकाकुल प्रभू कुंज
प्रभुकुंज ते शिवाजी पार्क प्रवास
छत्रपती शिवाजी महाराज पार्कात पोलिसांचा बंदोबस्त
दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
मुंबई: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी मुंबईतील ब्रीचकँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) निधन झाले. त्यांनी गेली सात वर्षाहून अधिक काळ दैवी स्वराने संगीत जगतात अधिराज्य गाजवले होते. रविवारी सकाळी ८.१२ मिनिटांनी या स्वराने अखेरचा श्वास घेतला असल्याचे डॉ. प्रतीत समदानी यांनी घोषित केले.
या वृत्तामुळे दीदींच्या चाहता वर्गाची ब्रीच कँडी हॉस्पिटल परिसरात गर्दी झाली होती.
लता मंगेशकर यांच्या बहीण गायिका आशा भोसले, भाऊ गायक संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी शनिवारी रात्री भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि श्रद्धा कपूर, पियुष गोयल यानीही रुग्णालयात भेट दिली होती.
लता मंगेशकर यांची प्रकृती शनिवारी अधिक बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले होते. त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असल्याने उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. दरम्यांन, मंगेशकर याना सुरुवातीपासूनच आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. शनिवारी अचानक त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. त्यामुळे त्याना पुन्हा कृत्रीम श्वासोच्छवास सुरु करण्यात आला होता. मात्र शनिवारपासून त्यांच्या प्रकृतीत प्रगती दिसत नव्हती.
त्या कोरोना आणि न्यूमोनियातून मुक्त झाल्या होत्या. मात्र कोविडनंतर निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीमुळे उपचार थिटे पडले. अखेर रविवारी सकाळी सव्वा आठच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याचे डॉ. समदानी यांनी सांगितले.
दीदींना ८ जानेवारीला कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात लता दीदींना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. २२ जानेवारी रोजी लता मंगेशकर कोरोना आणि न्यूमोनिया मुक्त झाल्या. त्यांची प्रकृती बरी सुधारली होती. त्यामुळे व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले होते. पण त्यांचे वय पाहता त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.
ब्रीच कँडी हॉस्पिटल:
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले. गडकरी यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधत दीदींचे निधन झाल्याचे घोषित केले.
रविवार सकाळ लतादीदींच्या चाहत्या वर्गासाठी शोकाकुल ठरली. सकाळी सव्वा आठ वाजता त्यांच्या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे मुंबईत पसरले. त्यावेळी ब्रीच कँडी हॉस्पिटल परिसरात गर्दी वाढू लागली. दीदींचे निवासस्थान प्रभुकुंज पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रीचकँडी हॉस्पिटलला चाहत्यांचा वेढा पडला होता.
कंबाला हिल भुलाभाई देसाई मार्गावर हळू हळू गर्दी वाढली लागली. हॉस्पिटलमधील सोपस्कार पार पडल्यावर दीदींचे पार्थिव रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले. यावेळी भुलाभाई देसाई रस्ता ’लता दीदी अमर रहे‘ च्या घोषणांनी निनादून निघाला. मात्रा दीदींचे अखेरचं दर्शन न झाल्याने हिरमुसलेला चाहता वर्ग प्रभुकुंजच्या दिशेन निघाला.
शोकाकुल प्रभू कुंज:
लता दीदींचे निवासस्थान पेडर रोडवरील प्रभू कुंज आज शोकाकुलात बुडाले होते. ब्रीच कँडीहून प्रभुकुंजवर पार्थिव येण्यापूर्वी शिवसेना नेते सुभाष देसाई, गीतकार जावेद अख्तर, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, स्व. किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार, गझल गायक पंकज उदास, डायरेक्टर आशुतोष गोवारीकर, राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर, शर्मिला ठाकरे, संगीतकार अजय-अतुल, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, अभिनेता अमिताभ बच्चन, डायरेक्टर संजय लीला भन्साली, भाजपाचे आशिष शेलार प्रभु कुंजवर दाखल झाले होते.
प्रभुकुंजवरुन सायंकाळी ४.३० नंतर पार्थिव शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी लष्कर, हवाई दल, नौदल आणि महाराष्ट्र पोलीस दलातर्फे प्रभू कुंजबाहेर संयुक्त संचलन करण्यात आले.
प्रभुकुंज ते शिवाजी पार्क प्रवास:
दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमातात दादर येथील शिवाजी पार्क येथे अंत्यविधी झाला. बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यदर्शनाकरता जशी व्यवस्था करण्यात आली होती त्याप्रमाणे दीदींच्या अंत्यदर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जी उत्तर पालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघांवकर यांनी दिली.
महापालिकेकडून शिवाजी पार्कात स्टेज उभारण्यात आले होते. तसेच चाहत्यांच्या गर्दीचा विचार करुन व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, प्रभुकुंज निवास ते शिवाजी पार्क असा अंत्ययात्रेचा मार्ग ठरविण्यात आला होता.
प्रभुकुंज ते महालक्ष्मी कॅडबरी जंक्शन, हाजी अली जंक्शन, सी फेस रोड, वरळी ऑस्ट्रिया मॉल, वरळी नाका ओलांडून पोद्दार हॉस्पिटलपुढील दूरदर्शन सिग्नल ओलांडून वरळीकर चौकात अंत्ययात्रा निघाली. पुढे प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिर, इंदू मिल चैत्यभूमी सिग्नल ते शिवाजी पार्कात पार्थिव दाखल झाले.
या प्रवासाच्या प्रत्येक टप्यात पार्थिव येतांना दीदींना श्रद्धांजली वाहण्यास चाहता वर्ग जमत होता.
छत्रपती शिवाजी महाराज पार्कात पोलिसांचा बंदोबस्त:
लता दीदींचे पार्थिव सायंकाळी ६ नंतर शिवाजी पार्क येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोशयारी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांची उपस्थिती राहणार असल्याने शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शिवाय व्हीव्हीआयपी व्यक्ती दाखल होणार असल्याने विशेष खबरदारी घेण्यात आली होती. मिनाताई ठाकरे स्मृती मार्गापासून पार्क पर्यंत जाणारा रस्ता बॅरेकेट्स लावून बंद ठेवण्यात आला होता.
लोकल ते ग्लोबल प्रसार माध्यमांची गर्दी:
लता दीदींच्या वलयाला कुठलाही प्रांत, सीमा किंवा भाषेचे बंधन नव्हते. त्या सर्वांच्याच होत्या. त्यांच्या निधनाचे वार्तांकन करण्यासाठी देशविदेशातील प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. सकाळी दीदींच्या निधनाची वार्ता समजताच माध्यम प्रतिनिधी लेखणी, कॅमेरा, ट्रायपॉड, आणि बुम घेऊन लता दीदींचा अखेरचा प्रवास आणि आठवणी टिपताना दिसून आले.
दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा:
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला होता. तसेच लतादीदींवर संपूर्णपणे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी दिल्या होत्या. तसेच राज्य सरकारने सोमवारी ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली.
या संदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, रविवारी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१ चा अधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
हृदयनाथ मंगेशकरांनी मुखाग्नी दिला
अंत्यसंस्कार करण्यापूर्वी लता मंगेशकर यांचे पार्थिव त्यांच्या घरी प्रभू कुंज येथे नेण्यात आले होते. भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी बहिणीला मुखाग्नी दिला. त्यानंतरचे विधी हृदयनाथ यांच्या मुलाने – आदिनाथ मंगेशकरांनी केले. आपल्या सुरेल आवाजाने सहा दशकं कोट्यवधी श्रोत्यांच्या हृदयांवर राज्य करणाऱ्या लता मंगेशकर यांना शेवटचं पाहताना साऱ्यांचेच डोळे पाणावले होते.