By विजय साखळकर

@maharashtracity

वरदराजन उर्फ वरदाभाई मुदलियार (Varadarajan Mudaliar) हा एकच असा डाॅन (Underworld Don) होता की मुंबईतील घनघोर टोळीयुध्दातही (Mumbai Gangwar) तो आपलं अस्तित्व टिकवून राहिला आणि गॅंगवारपासूनही दूरच होता. त्यानं मोठ्या खुबीने विरोधातील गॅंगस्टर्सना त्यांच्या अडचणीत मदत करीत मैत्रीचा हात पुढे केला आणि स्वत:चा किल्ला सांभाळला. पण १९८८ नंतर त्याच्या साम्राज्यासमोर अनंत अडचणी निर्माण होत गेल्या.

एकतर पोलीस खात्यात वाय. सी. पवार (Deputy Commissioner of Police YC Pawar) त्याच्या राशीला आले. त्याच सुमारास त्याचे आरंभापासूनचे सहकारी बेबनाव झाल्याने त्याच्यापासून दूर झाले. त्याने कसातरी आपला किल्ला राखला पण पोलिसांच्या रोजच्या ससेमिऱ्याला चकवता चकवता त्याला नाकीनऊ आले. त्याच्या नजरेसमोर एके काळचा शत्रू पण नंतर मित्र झालेला राजन नायर (Rajan Nair) मारला गेला. पुढे अमर नाईक (Amar Naik) मारला गेला.

त्यानं मैत्रीचे बंध निर्माण केलेले अनेकजण मुंबईच्या टोळीयुध्दात मारले गेले. ते परस्परांशी लढताना मारले गेले. त्यामुळे तो वैतागून फरार झाला. त्याचा अतापता शोधणं हे फार अवघड होतं. कारण त्याचे त्याच्या एरियातील लोकांवर इतके उपकार होते की कुणी माहिती पुरवणंही शक्य नव्हतं.

वरदाच्या कार्यशैलीविषयी एक असा प्रवाद होता की तो ज्यांच्यावर खुनासारखे (murder) गंभीर गुन्हे दाखल असतील त्यांना सर्वोतोपरी मदत करीत असे. त्याचा कारागृहातील (Jail) खर्च तोच पाहत असे. त्याला चांगला वकील (lawyer) मिळवून देत असे आणि त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या घरची जबाबदारीही उचलत असे.

साहजिकच न्यायालयातून (court) सुटका झाल्यावर तो वरदाच्या दरबारातील निष्ठावंत पाईक होत असे. एका राजकीय नेत्याच्या (political leader) खुनात अडकलेल्या काही तरुणांना ते सुटल्यानंतरच्या काळात वरदाभाईने दरमहा तनखा चालू करून आपल्या दरबारात आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी त्या साऱ्यांनीच आम्ही प्रोफेशनल खुनी नाही, असे सांगून नकार दिला होता.

त्यातील एकाशी माझे बोलणे झाले होते. (आज तो हयात नाही) त्याने सांगितलं की जर आम्ही तनखा स्वीकारला असता तर आजच्यासारखी भुईला पाठ टेकताच येणारी निवांत झोप घेता आली नसती. शिवाय आमचे प्रत्येकाचे कुठल्या ना कुठल्या कामात कौशल्य होते. तेच पणाला लावून आम्ही आमचं घर सांभाळू शकत होतो.

वरदाचा कसून शोध घेतल्यानंतर तो तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील आपल्या मूळ गावी असल्याची खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली. ए.सी.पी. ललितकुमार गोडबोले (ACP Lalitkumar Godbole) यांच्यावर वरदाला गावाहून मुंबईत आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यांनी त्याला मुंबईत आणला.

मुंबईतील अनेक प्रकरणाचे दावे सुरू झाले आणि त्यातून जामीनावर सुटलेला वरदाभाई पुन्हा गावी गेला. आजारी पडला आणि त्याच त्याचा मृत्यू झाला. (Varadarajan died after illness)

मृत्यूनंतर वरदाचे साम्राज्य प्रचंड गोंधळात अडकले. त्याच्या मुलाचा एक बार होता. त्यावर त्याची उपजीविका चालत होती. वरदा गेल्यानंतर त्याचे दरबारी आणि त्याचं साम्राज्य निर्णायकी झालं आणि अखेर मुलगाही मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाच्या (Mumbai Crime Branch) हाती लागला.

त्या काळात मुंबईत बनावट नोटांचा (fake currency) व्यवहार तेजीत होता आणि पोलिसांनी त्याला बनावट नोटांसह उचलला. पिता दिवंगत झाल्यावर व्यवसायात खोट येत गेली व ती भरून काढण्यासाठी या फंदात पडल्याची कबुली त्यानं पोलिसांना दिली होती, असे ववृत्तपत्रांतून प्रकाशित झाले होते.

एका आगीत घरातील पती- पत्नी जळून खाक झाल्याचे प्रकरण नोंदविण्यात आले. अधिक तपासात ती वरदाभाईची मुलगी महालक्ष्मी (Mahalakshmi daughter of Varadarajan died of suffocation in fire) व सोबत तिचा पती हेमचंदर (Hemachander) तिथं राहत असल्याचं उघड झालं. वरदाभाईची मुलगी हा संदर्भ पुढे आल्यानं यात काही घातपात आहे का, याची चौकशी करण्यात आली. पण तपासात निष्पन्न झाले की त्या दोघांनाही हाय डायबिटीस (High Diabetes) आणि हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) होते आणि त्यामुळे त्यांच्या हालचाली फार मंद झाल्या होत्या.

(पुढील अंकी मन्या सुर्वे)

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षं गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here