By Shaila Dhabe
स्टॉकहोम: युरोप खंडातील- स्वीडनची राजधानी असलेल्या स्टॉकहोम शहरात आठवडी सुट्टीचे निमित्य साधून, मराठमोळ्या चमूने एकत्र येत शिवजयंती उत्सव दणक्यात साजरा केला. मिश्रदेशीय संस्कृतीत वाढणाऱ्या येथील पिढीपर्यंत छत्रपती शिवरायांचे चरित्रगुण पोहचावेत आणि महाराज्यांचे मोठेपण त्यांना आपसूक कळावे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.
त्यादृष्टीने आखलेल्या या कार्यक्रमात करिष्मा साहूजी यांच्या – चित्रकट्ट्यात मुलांनी महाराजांची चित्रे काढली आणि रंगविली. ‘महाराज का जाणावेत ?’ या विषयावर ओंकार जोशी यांचे प्रेसेंटेशन मुलांना आणि पालकांनाही खूप माहिती देऊन गेलं. त्यापाठोपाठ त्यांनी घेतलेली प्रश्नमंजूषा मुलांना खूप भावली. अनुजा कुलकर्णी आणि चिन्मय इंगे यांनी मुलांकडून करवून घेतलेल्या कल्पक खेळांनी – कार्यक्रमाची रंगत वाढवीली. पुढे, शैला धाबे, अक्षय ओढेकर, केदार धर्माधिकारी यांनी सांगितलेल्या शिवबांच्या गोष्टीतून सांस्कृतिक कार्यक्रम फुलत गेला.
या शिवजयंतीचे विशेष आकर्षण होती चिमुकली मुले! परकर पोलक्यात नटलेल्या एरिषा ओढेकर हिने – शाहिस्तेखानाची गोष्ट सांगत टाळ्यांचा गजर मिळवला. क्षिती अंधारे, स्वरा लोखंडे आणि स्वदा लवेकर ह्यांनी ‘राज आलं जी’ .. गाण्यावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. डोक्यावरचा भारदस्त फेटा पेलत, तलवार मिरवत छोट्या पार्थ चौधरीने दिमाखात शिवगजर केला. सईबाईंच्या मनोगताचा मोठा उतारा म्हणून दाखवत आर्या बारगळ सगळ्यांना आश्चर्यचकित करून गेली. नऊवारी पातळ व नथीत सजलेली छोटी अन्वी जोशी – जिजाऊंच्या भूमिकेत स्टेजवरच्या सहज वावरातून, कौतुकाची थाप पटकावून गेली.
अल्पोपहार आणि चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली. पाऊस आणि थंडीला न जुमानता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी एकत्र जमलेल्या सगळ्या सहभागी मंडळींनी हा कार्यक्रम एकत्रित यशस्वी केला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवाराच्या प्रोत्साहनातून येथे संपन्न झालेलय शिवजयंती उत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे.