By विजय साखळकर

@maharashtracity

मन्या सुर्वेचा एन्काउंटर (encounter of Manya Surve) झाला त्याआधी तो प्रसिद्ध व्यक्तींना लाखा- लाखाच्या खंडणीसाठी नडला होता. त्यापैकी पहिला बळी होता त्याच्या काॅलेजमधील मित्र. काॅलेज सोडल्यानंतर अशोक मस्तकार याने मस्तकार ट्रॅव्हल्स नावाची ट्रॅव्हलिंग एजन्सी (travel agency) काढली होती. त्याची आणि मन्या सुर्वे याची होत तोंडओळख होती. एकदोनदा फोनवरून त्यानं मस्तकार याच्याकडे लाखाची मागणी केली होती.

तू भरपूर पैसे छापले आहेस, मला एक लाख दे, असा हुकूम त्यानं सोडला होता. मी मेहनत करून पैसा कमावलाय, तुला का द्यावा, असा उलटसवाल मस्तकार याने त्याला केला होता. नाही दिलेस तर गाठ माझ्याशी आहे, अशी तंबी त्यानं दिली होती. पण मस्तकार याने फारसं मनावर घेतलं नाही.

काही दिवसांनी एक फोन त्यांच्या कार्यालयात आला आणि अस्खलीत अरबी भाषेत (Arabic language) त्यानं दोन गाड्यांची मागणी केली. ड्रायव्हरसह एकूण खर्चाचा अंदाज घेतला आणि फोन करणाऱ्या इसमानं रात्री साडेआठ वाजता पैसे देऊन गाड्या नेण्यासाठी येणार असल्याचं सांगितलं. त्यानुसार मस्तकार त्याची वाट पाहत थांबला.

साडेआठ वाजता एक धिप्पाड अरब त्याच्या कार्यालयात दाखल झाला आणि त्यानं बोलायला सुरुवात केली. पण पैसे देण्याचं तो नाव काढत नव्हता. त्याचा हात सारखा अरबी पेहरावात जात असल्याचं मस्तकार यांच्या लक्षात आलं. त्याच वेळी आवाज ओळखीचा वाटू लागला आणि एका क्षणात त्याने ‘मन्या’ अशी हाक त्याला मारली. त्याच वेळी जवळ असणारं एक बटण दाबलं.

Also Read: मनोहर अर्जुन सुर्वे – मुंबई अंडरवर्ल्डचं पाठ्यपुस्तक

त्याच्या कार्यालयाच्या वरील मजल्यावर ड्रायव्हरांसाठी रेस्ट रूम (Restroom) ठेवली होती. इमर्जन्सी बेल (emergency bell) वाजल्याने आराम करीत असलेल्या ड्रायव्हरांनी खाली धाव घेतली. आपला डाव फसल्याचे लक्षात आल्यानं जीव वाचवण्यासाठी मन्यानंही तेथून सूबाल्या केला. पण जाण्यापूर्वी त्यांनं अरबी पोषाखात दडविलेल्या ऍसिडच्या बाटलीतून ऍसिड मस्तकार यांच्या चेहऱ्यावर फेकलं (acid attack). त्याला इस्पितळात दाखल व्हावं लागलं. मन्या पळाला. मस्तकार इलाज करवून घरी परतला. पण त्यांच्या नैसर्गिक चेहऱ्यात बदल झाला होता.

या बदलाला अनुसरून मन्यानं नवा वाक्प्रचार पुढे आणला. तो खंडणीची (extortion) धमकी देतांना म्हणायचा, नाही दिले लाख तर
मस्तकारसारखा तुझा चिन्या (चिनी माणूस) करून टाकीन.

मन्याचा दुसरा बळी मात्र बळी ठरला नाही. पण व्यायामशाळेच्या या संस्थापकानं मन्याला धावणं शिकवलं. शिवाजी पार्कला (Shivaji Park) असणाऱ्या पपी पाटील यांच्या व्यायामशाळेजवळ (Gym) तो आपल्या चार साथीदारांसह गेला आणि त्यानं नेहमीसारखी लाखाची मागणी केली. पपी पाटील यांनी त्याला बोलतं ठेवलं. एवढे पैसे कशाला हवेत? इतकी रक्कम कुणी रोख ठैवत नाही, पैसा बॅंकेत असतो. आता बॅंका बंद झाल्या आहेत. पैसे दिल्यावर तू मला ते एकरकमी परत करणार की हप्त्या- हप्त्यानं देणार? असे प्रश्न विचारीत त्यांनी वेळकाढूपणा सुरू केला.

संध्याकाळी व्यायामशाळेत येणाऱ्या तरूण मुलांचा ओघ वाढेपर्यंत त्याला असल्या विचित्र प्रश्नात अडकवून ठेवायचा हे त्यांचं धोरण होतं. मन्याच्या लक्षात ती गोष्ट आल्यानं मन्यानं नेहमीची पेटंट धमकी दिली. देणार आहेस की मस्तकारसारखा तुझा चिन्या करू?

बाहेर आवाज वाढत असल्याचं पाहून आतली मंडळी बाहेर आली आणि त्याच वेळी मन्यानं पिस्तुल (Pistol) काढलं. पण बाहेर आलेली सौष्ठवपूर्ण शरीरं (bodybuilders) पाहून मन्या टरकला व पळत सुटला. मन्या व त्याच्या साथीदारांचा व्यायामशाळेतल्या मुलांनी पाठलाग केला. पण तो हाती लागला नाही.

मन्याचं तिसरं गिऱ्हाईक होतं… सतीश राजे. सतीश राजे व्यवसायानं बिल्डर (developer) होते. (त्यांची माहिती पुढे येईलच.) पनवेलला (Panvel) कामानिमित्त जाऊन परतत असताना मन्यानं त्यांना गाठलं. सतीश राजेंचा (Satish Raje) मन्यानं त्यावेळी केलेला पाठलाग हा हिंदी सिनेमातील दृश्यांसारखा होता.

राजे त्यांच्या कारमध्ये ड्रायव्हरसीटवर. मन्या त्याच्या गाडीत त्याच्या ड्रायव्हर सीटवर. आजच्या इतकी वर्दळ (traffic) त्या काळात पनवेल – मुंबई रस्त्यावर नव्हती. दोघंही एकमेकांशी आपापसात गप्पा करीत होते. मन्या त्यांना लाखासाठी गळ घालत होता. ते उडवा-उडवीची उत्तरे देत होते. अखेर राजेंनी त्याला बोलत बोलत दादरच्या (Dadar Hospital) सुश्रुषा हाॅस्पिटलजवळ आणले आणि त्यांनी हाॅस्पिटलचा आश्रय घेतला. मन्या त्यांच्या बाहेर येण्याची दबा धरून वाट पाहू लागला.

राजे यांनी मुंबईतील आपल्या संपर्कांना फोनवरून सतर्क केले. काही वेळातच सुश्रृषाबाहेर एकेक नामचीन मंडळी जमा होत गेल्यावर त्यांना ओळखणारा मन्या हळूच तेथून सटकला. त्यानंतर काही दिवसांनी मन्याची चकमक झाली.

या चकमकीनंतर नामांकित मराठी वृत्तपत्रातील ‘धावते जग’ या सदरात प्रकाशित झालेल्या मन्याबद्दलच्या मजकुराचा आशय असा होता….. ‘मन्या तू चुकलास. तू ज्यांच्या मागे लागलास ते फार मोठे होते. त्यामुळेच तुझी चकमक झाली.’

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here