@maharashtracity

ओणम उत्सवानंतर केरळमध्ये रूग्ण वाढल्याने धसका

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मंत्रीमंडळात चर्चा

आरोग्य यंत्रणा सज्ज 

मुंबई: केरळ (Kerala) राज्यात शनिवारी साजऱ्या झालेल्या ओणम उत्सवानंतर (Onam Festival) एका दिवशी तब्बल ३१ हजार कोरोना रूग्ण वाढले. तिसरी लाट (third wave of covid) केरळपासून सुरु होते कि काय असा प्रश्न घेऊन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health minister Rajesh Tope) यांनी केरळच्या आरोग्य मंत्र्यांना फोनवर संपर्क साधला असता गर्दीमुळे रूग्ण वाढ झाली असल्याचे निश्चित उत्तर मिळाले.  

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मंत्रीमंडळात चर्चा झाली. यावेळी टोपे यांनी महत्वाचे निर्णय घेतले असून राज्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी सज्ज असल्याचे सांगितले.

केरळ राज्यात ओणम दिवशी गर्दी झाल्याने तसेच चाचण्यांची संख्या वाढविली असल्याने रूग्ण संख्या वाढली असल्याचे केरळचे आरोग्य मंत्री यांनी सांगितले. 

या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने पूर्ण तयारी केली आहे. तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होण्याच्या अंदाजाने त्याच्या टक्केवारीनुसार १२ टक्के ऑक्सिजनच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले. तसेच १०० टक्के रिक्त जागा भरती होणार असून दिनांक २५ आणि २६ ला वर्ग क आणि ड वर्गाच्या भरती परीक्षा घेतल्या जाणार आहेत. 

तसेच १२०० डॉक्टरांचे दिनांक ५ सप्टेंबरच्या आधी समुपदेशन करून आदेश दिले जातील. तर सुपर क्लास वनची भरती एमपीएससीकडून (MPSC) करत असल्याचे सांगण्यात आले. या व्यतिरिक्त अ, ब, क, ड वर्ग रिक्त पदे त्वरित भरली जाणार आहेत.

ऑक्सिजनची (Oxygen) १२०० ते १३०० मेट्रिक टन पूर्वी उपलब्धता असायची. आता २००० मेट्रिक टनपर्यंत गरज वाढवली आहे. जुलैच्या अधिवेशनात आर्थिक तरतूद करून घेतली आहे. शिवाय औषधे, आवश्यक उपकरणे घेतली जातील. तसेच एक हजार रुग्णवाहिकापैकी (Ambulance) ५०० रुग्णवाहिका दिल्या असून उर्वरित ५०० सप्टेंबर अखेर पर्यंत उपलब्ध होतील. यामुळे राज्यातील १०० टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), रुग्णालये, जिल्हा रुग्णालयांना (civil hospital) रुग्णवाहिका मिळणार आहेत.

एशियन डेव्हलपमेंट बॅंकेचा (Asian Development Bank – ADB) रु ५ हजार कोटींचा आरोग्य संस्थांच्या बांधकामांचा कर्ज प्रस्तावाचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पहिल्या लाटेत २० लाख तर दुसऱ्या लाटेत ४० लाख बाधित झाले. तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  त्यात १२ टक्के लोकांना ऑक्सिजन लागतो. 

गेल्या वेळी साडेसहा लाख ॲक्टिव्ह रुग्ण होते. आता १३ लाख ॲक्टिव्ह रुग्ण शक्यता व्यक्त होत आहे. ही आकडेवारी अंदाजित असून त्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यासाठी राज्य सरकार  प्रयत्नशील आहे. म्हणूनच ‘सिरो सर्व्हेलन्समध्ये परफॉर्मन्स ऑफ स्टेटसची तुलना केली जाते. 

देश पातळीवर सिरो सर्व्हिलन्सचा अहवाल आला असून अहवालानुसार केरळ राज्य सर्वात कमी बाधित म्हणजे ४२ टक्के असून त्या खालोखाल ५५ टक्के महाराष्ट्र आहे. तर मध्यप्रदेश (MP) राज्याची बाधित होण्याची टक्केवारी ८९ टक्के असल्याची अहवालातून दिसते. पहिल्या व दुसऱ्या लाटेत लहान मुलांची बाधित टक्केवारी ही ८ ते १० टक्के असल्याचे सांगण्यात आले.

१०० टक्के लसीकरण करण्याचा प्रयत्न :

लसीकरणाच्या मुद्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली असून केंद्राने सप्टेंबर महिन्यात १ कोटी ७० लाख डोसेस देण्याचं मान्य केलं असल्याचे सांगण्यात आले. ५० लाख डोसेस जास्तीचे मिळाल्यास त्याचा उपयोग लसीकरणासाठी होईल. पहिला डोस दिला असता दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात आहे. त्या प्रमाणे लस वितरित केली जात आहे. शिवाय ग्रामीण भागात मागणीप्रमाणे पुरवठा केला जात आहे. 

तिसऱ्या लाटेसाठी लसीकरण(vaccination) हा रामबाण उपाय असून  लसीकरणाला गती दिल्यास गंभीरता राहणार नाही. तिसरी लाट अमेरिका (USA), युके (UK), रशिया (Russia) इथे सुरु असून तेथील मृत्यूदर लसीकरणाच्या परिणामातून उतरताना दिसत आहे. राज्यात  १०० टक्के लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात किमान ५२ टक्क्यांपर्यंत लोकसंख्या पहिला डोस दिला आहे. उरलेले ४८ टक्के लोकसंख्या लवकर पूर्ण करायचे असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात ७१ हजार आशा स्वयंसेविका ३६०० गट प्रवर्तक असून त्यातील आशा स्वयंसेविकांना १५०० रुपये तर गटप्रवर्तकांना १७०० रुपये वाढ देण्यात येणार आहे. यासाठी दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांचा यासाठी खर्च येणार आहे, त्याला मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. जुलैपासून पगार वाढ होऊन तो दिल्या जाईल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here