@maharashtracity

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे आदेश
७४ हजार भाडेकरूंना दिलासा

मुंबई: मुंबईतील बीआयटी चाळीतील (BIT chawl) पालिकेच्या भाडेकरूंवर प्रशासनाकडून लादण्यात आलेली भाडेवाढ अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या स्थगिती आदेशाने रोखण्यात आली आहे. यासंदर्भातील परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

स्थायी समितीच्या या निर्णयामुळे बीआयटी चाळीत राहणाऱ्या ७४ हजार भाडेकरूंना मोठा दिलासा मिळणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ही माहिती दिली.

गेल्या मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाच्या (corona) प्रादूर्भावामुळे लाखो मुंबईकरांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार गेला. संसाराचा गाडा चालवणे, मुलांचे शिक्षण पूर्ण करणे कठीण झाले. अनेक समस्यांनी आणि महागाईने मुंबईकर पिचले आहेत.

अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेने पालिकेच्या चाळींसह भूखंडावरील निवासी आणि व्यावसायिक भाडेकरु यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या मासिक भाडयात वाढ करण्याबाबत व त्याची पूर्वलक्षी पद्धतीने अंमलबजावणी करण्याबाबत एक परिपत्रक काढले. तसेच, त्यावर अंमलबजावणीही सुरू केली.

त्याचे पडसाद स्थायी समितीच्या मागील बैठकीत उमटले होते. त्यावेळीही स्थायी समिती अध्यक्ष जाधव यांनी सदर भाडेवाढीची अंमलबजावणी न करण्याबाबत फर्मावले होते.

मात्र प्रशासनाने तरीही उर्मटपणा चालवल्याने आज स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा तीव्र पडसाद उमटले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, पुन्हा एकदा पालिका प्रशासनाचे कान उपटले व भाडेवाढीची अंमलबजावणी करण्यास मनाई आदेश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here