मुंबईतील १३२ हॉटेल्स आणि व्यावसायिक इमारतींना अग्निशमन दलाची नोटीस
१२० दिवसांत अग्निशमन सुरक्षा यंत्रणा सुरळीत न केल्यास पाणी – वीज कापली जाणार
By सचिन उन्हाळेकर
Twitter : @Sachin2Rav
मुंबई: सावधान ! निवासी इमारत, व्यावसायिक इमारत तसेच हॉटेल आणि मॉलमधील अग्निसुरक्षा यंत्रणा सुव्यस्थित (fire extinguisher) सुरळीतपणे सुरु आहे की नाही, हे पाहण्यासाठी मुंबई अग्निशमन दल (fire brigade) कधीही येणार आहे. यावेळी अग्निसुरक्षा यंत्रणा बिघडलेली असेल तर मुंबई अग्निशमन दलातर्फे आग प्रतिबंधक व जीवरंक्षक उपाययोजने संबंधितातील फायर नोटीस देण्यात येणार आहे. तशी सुरुवातही मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने करण्यात आलेली आहे. केवळ कारवाई करणे हा अग्निशमन दलाचा उद्देश नसून रहिवाशी इमारती, व्यावसायिक इमारती, हॉटेल्स आणि मॉलमधील संबंधितांनी स्वतः ची अग्निसुरक्षा यंत्रणा सुव्यस्थित सुरळीत ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून आगीच्या किंवा शॉर्ट सर्किटच्या दुर्घटनेत कमीत वित्तहानी तसेच जीवित्तहानी टाळता येऊ शकते, असा उद्देश या अग्निसुरक्षा तपासणी मागील असल्याचे सांगितले जात आहे.
अग्निशमन सुरक्षा यंत्रणा व्यवस्थित सुरळीत ठेवण्याबाबत वारंवार सूचना करूनही कित्येकदा याकडे कानाडोळा करण्याचे काम संबंधितांकडून होताना दिसत आहे. अशावेळी आग लागल्यास अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बंद असल्याचे आढळत आहे. याची गंभीर दखल घेत मुंबई अग्निशमन दलातर्फे निवासी आणि व्यावसायिक इमारतीसोबत हॉटेल्स आणि मॉलमधील अग्निसुरक्षा तपासणी करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.
अग्निशमन दलातर्फे २ डिसेंबर आणि ३ डिसेंबर २०२२ रोजी मुंबईतील व्यावसायिक इमारती, हॉटेल आणि मॉलमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा सुस्थितीत सुरळीतपणे सुरु आहे किंवा नाही यासंबंधी अग्निसुरक्षा तपासणी करण्यात आली. यामध्ये ८८ व्यावसायिक इमारतींपैकी ४० व्यावसायिक इमारतींमधील अग्निसुरक्षा यंत्रणा बिघडलेली तसेच इमारतीतून बाहेर पडण्याच्या मार्गात अडथळे असल्याचे निर्देशनास आल्याने संबंधितांना आग प्रतिबंधक व जीवरंक्षक उपाययोजने संबंधितातील फायर नोटीस देण्यात आलेली आहे. यासोबत ४४० हॉटेल्समधील अग्निसुरक्षा संबंधित तपासणी करण्यात आली असता ९२ जणांना फायर नोटीस देण्यात आलेली आहे. यामध्ये सुप्रसिद्ध व्यावसायिक इमारतींसोबत हॉटेलांचाही समावेश आहे.
ज्यांना फायर नोटीस देण्यात आलेली आहे, त्या संबंधित व्यावसायिक इमारती आणि हॉटेल्समधील अग्निसुरक्षा यंत्रणा बिघडलेली होती तर काहींची यंत्रणा असूनही सुरळीतपणे सुरु नव्हती. त्यात काही इमारतींमध्ये बाहेर पडण्याच्या मार्गात अडथळे असल्याचे ही निदर्शनास आले आहे. यामुळे आग किंवा अन्य दुर्घटनादरम्यान बाहेर पडताना अत्यंत धोकादायक असल्याने संबंधितांना फायर नोटीस देण्यात आलेली आहे.
फायर नोटीस मिळाल्यापासून १२० दिवसांत संबंधितांनी अग्निसुरक्षा यंत्रणा सुव्यवस्थित सुरळीतपणे सुरु करणे, यासोबत बाहेर पडण्याच्या मार्गावरील अडथळे दूर करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास अग्निशमन दलातर्फे पाणी आणि वीजेची जोडणी कापण्याची कारवाई करण्याबाबत पाणी आणि वीज विभागाला कळविण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.
तीन वर्षांपूर्वी मुंबई अग्निशमन दलातर्फे गोरेगाव येथील रघुलीला मॉलला फायर नोटीस देऊनही त्यांनी मॉलमधील अग्निसुरक्षा यंत्रणा सुस्थितीत सुरळीत केलेली नव्हती. यामुळे रघुलीला मॉलचे पाणी आणि विजेचे कनेक्शन तोडण्याची कारवाई अग्निशमन दलातर्फे करण्यात आली होती. अशा पद्धतीने मुंबईत पहिल्यांदा अग्निशमन दलातर्फे पाणी आणि विजेची जोडणी तोडण्याची कारवाई करण्यात आली होती. तर दोन वर्षांपूर्वी डी वार्डमधील धर्मव्हिला सहकारी गृहनिर्माण सोसायटी या निवासी इमारतीला आणि मागील वर्षी ओशिवरा येथील क्रिस्टल प्लाझा या व्यावसायिक इमारतीचे पाणी आणि विजेची जोडणी तोडण्याची कारवाई अग्निशमन दलातर्फे करण्यात आली होती.
अग्निशमन दलातर्फे प्रत्येक महिन्याला कोणत्याही दिवशी मुंबईत कोठेही अग्निसुरक्षा संबंधित तपासणी केली जाणार आहे.