@maharaahtracity

मुंबई: विलेपार्ले येथील प्राईम मॉलमध्ये (Prime Mall) शुक्रवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोघेजण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर कूपर रुग्णालयात (Cooper Hospital) उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, विलेपार्ले, इरला, सोसायटी रोड येथील तळमजला अधिक तीन मजली प्राईम मॉलमधील पहिल्या मजल्यावरील खासगी जागेत शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास आग लागली.

आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी व अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. मात्र, ज्वलनशील सामानामुळे आग हळूहळू भडकली आणि अवघ्या एका तासातच
म्हणजे ११.२६ वाजेच्या सुमारास आग स्तर -४ ची झाल्याचे अग्निशमन दलाने घोषित केले. या आगीमुळे मोठी वित्तीय हानी झाली आहे.

या आगीचा काळाकुट्ट धूर नाकातोंडात गेल्याने मुबासिर मोहम्मद (२०) ह्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांस तात्काळ नजीकच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच, आग विझविताना फायरमन मंगेश दिनकर गावकर (५४) हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावरही कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मुबासिर मोहम्मद यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

Also Read: नितीन राऊत यांच्या हट्टासाठी सामाजिक न्याय विभागाचे 875 कोटी रुपये पळवले !

दरम्यान, अग्निशमन दलाने १६ फायर इंजिन व ११ वॉटर टँकर यांच्या साहाय्याने दुपारी २.३० वाजता या भीषण आगीवर नियंत्रण मिळविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ही आग का व कशी लागली, त्याची कारणे काय याबाबत अग्निशमन दल व स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here