@maharashtracity

मुंबई: मुंबई शहर भागातील नागपाडा, कामाठीपुरा (Kamathipura) येथील एका दुमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील टेरेसकडील भागात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आग लागल्याने खळबळ उडाली. या आगीत तीन घरे जळाली. सुदैवाने आगीची माहिती मिळाल्यानंतर इमारतीमधील राहिवाशांना वेळीच बाहेर काढल्याने ते बचावले. कोणतीही जीवित हानी झाली नाही.

प्राप्त माहितीनुसार, नागपाडा येथील गजबजलेल्या कामाठीपुरा भागातील गल्ली क्र.५ नजीक असलेल्या रहिवाशी इमारतीला अचानक आग लागली. ही आग बघता बघता भडकली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

मात्र पोलीस, बेस्ट वीज विभाग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी तातडीने धावपळ करून इमारतीमधील तीन घरात राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबातील १५ पेक्षाही जास्त राहिवाशांना वेळीच घराबाहेर काढून समोरील मदरसामध्ये स्थलांतरीत केल्याने ते बचावले. त्यांची जेवण व इतर सुविधा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

अग्निशमन दलाने (Fire brigade) तातडीने ४ फायर इंजिन, ३ जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने या आगीवर एका तासात नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, अशी माहिती काँग्रेसचे नगरसेवक जावेद जुनेजा (Congress Corporator Javed Juneja) यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here