@maharashtracity

चार्लस्टन, अमेरिका: साहित्य कला व्यक्तीत्व विकास मंच अंतर्गत साकव्य परदेशी परिवार समूहाचे प्रथम आंतरराष्ट्रीय कवी संमेलन शनिवार, दि. १६ एप्रिल रोजी आभासी पद्धतीने संपन्न झाले.

सुप्रसिद्ध लेखक, कवी, आणि साकव्य समूहाचे संस्थापक, पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन अतिशय बहारदार पद्धतीने साजरे झाले. संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आणि कवी, संजीव दिघे उपस्थित होते.

संमेलनाचे अध्यक्ष, पांडुरंग कुलकर्णी यांच्या मनोगतातून सर्व सहभागी कवी – कवयित्रींचे आणि प्रत्येकाच्या कवितेचे कौतुक केले गेले. परदेशात राहून देखील भारतीय सांस्कृतिक वारसा, विशेषतः माय मराठीचा प्रसार हे सर्व साहित्यिक करत असल्याचा अभिमान त्यांच्या बोलण्यातून जाणवला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, संजीव दिघे यांनी त्यांच्या खास विनोदी शैलीत छोटे छोटे चुटकुले सांगत सगळ्यांना हसते केले. आपल्या भाषणात प्रत्येक कवितेबद्दल त्यांनी स्वतः चारोळी रचून अथवा त्या संदर्भातली अलक सांगून उपस्थित कवी कवयित्रींचे कौतुक केले आणि मनोबल वाढवले.

कवी संमेलनात ऑस्ट्रेलियामधून सर्जेराव पाटील, दुबई येथून रागिणी निशित रावळीया, एरवी कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या प्राची देशपांडे यांनी भारतातून, रशियामधून कल्याणी मसादे, नेदरलँड्स येथून शलाका कुळकर्णी, जर्मनीमधून संगीता पालवे, आणि अमेरिकेतून शिल्पा कुलकर्णी, तनुजा प्रधान आणि गौरी जोशी कंसारा या कवी – कवयित्री यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी कंसारा यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केले.

कार्यक्रमासाठी समूहाचा ध्वज बनवला ग्राफिक्सकारा, शरयू खाचणे यांनी आणि या कार्यक्रमाचे पोस्टर बनवले मिलिंद पगारे यांनी. साकव्यचे हे सदस्य जरी पडद्यामागचे कलाकार आहेत तरी ते कधी साक्षात पडदा किंवा ध्वज होवून जातात हे कळतही नाही, असे त्यांच्याविषयीच्या गौरवोद्गार पांडुरंग कुलकर्णी यांनी या प्रसंगी काढले.

वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या घटिकेला असणाऱ्या या सर्वांची भारताशी जोडलेली नाळ या कार्यक्रमाच्या रूपाने अधिक घट्ट झाली. आपण आपल्या परिवारालाच भेटल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर शेवटपर्यंत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here