By Yuvraj Patil

@yuvrajp_74

मॉल म्हणजे काय तर मोठी इमारत किंवा कनेक्ट इमारतींची मालिका, ज्यामध्ये विविध वस्तू एकत्र मिळणाऱ्या दुकानाची मालिका… ज्यात हॉटेल्स पण असेल असे ठिकाण… जगात 19 व्या शतकात बांधकामात अनेक प्रयोग झाले.. रचनात्मक शहर उभी राहिली… भारतात ब्रिटिशांनी (British) त्यांच्या शैलीत अनेक इमारती बांधल्या… पण देशात पहिल्यांदा शहराच्या मध्यभागी भव्य गोलाकार मार्केट उभं करून शहरातले सगळे रस्ते जोडण्याची अभिनव कल्पना सुचली ती लातूरकरांना… ((Latur)

साल होतं 1917 .. देशभरात ब्रिटिशांची सत्ता होती. मात्र लातूरवर निजामशाहीची (Nizam) हुकूमत होती. ब्रिटिशांबरोबर तह करून आपलं राज्य चालविणाऱ्या निजाम काळात लातूरमधल्या तत्कालीन व्यापाऱ्यांच्या डोक्यात अशा मार्केटची कल्पना सुचली की, सगळ्या गोष्टी लोकांना एकत्र मिळाव्यात. मग त्याची रचना पक्की झाली…

मध्यभागी देवींची प्रतिष्ठापना.. त्यामागे आपल्या पाठीशी आदीशक्तीचं पाठबळ आहे ही धारणा प्रत्येकाच्या मनात असावी… गंगमोहर, राकेशमोहर, ही कोणतीही भावना डोक्यात न घेता.. 8 जून 1917 रोजी लातूर मध्ये गंजगोलाईची स्थापना करण्यात आली.. त्याचे उदघाटन निजाम काळातील सुभेदारी – म्हणजे आयुक्त कार्यालय गुलाबर्गा स्थित होतं – त्याचे सुभेदार होते राजा इंद्रकरण… त्यांच्या हस्ते झाले आणि आजच्या व्याख्येप्रमाणे देशातला पहिला “मॉल” (Mall) लातूरात उभा राहिला.

गंज हा उर्दू शब्द आहे. त्याचा अर्थ होतो वस्तू बाजार.(आणि मराठवाड्यात मोठं गोल भांडे असते दूध वगैरे काढण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी त्यालाही गंज म्हणतात) अशी गोल वस्तू बाजार असलेली बाजारपेठ उभी राहिली.. त्याला 16 रस्त्यांनी जोडण्यात आले… या सोळा रस्त्यावर ठोक व्यापारी दुकान बसविली गेली.. एक रस्ता फक्त सोनारासाठी म्हणजे सराफ लाईन, दुसरा रस्ता फक्त कापड दुकान ती कापड लाईन, एक लाईन अन्नधान्याची भुसारलाईन…

असे 16 रस्ते सोळा ठोक व्यापाराच्या लाईन..

असं देशात कुठे आहे का? तर आहे. पण लातूरची गंजगोलाई उभी राहिल्यानंतर दिल्लीत (Delhi) 1921 मध्ये ब्रिटिश अधिकारी एडविन लुटनेस यांनी गोल मार्केट वसविले.. कमी जागेत अधिक दुकाने दळणवळणासाठी सोयीस्कर ठरतात म्हणून ही रचना केली… पुढे 1925 मध्ये रायपूरलाही गोल मार्केट ब्रिटिशांनी वसविले.

लातूरची गोलाई एतद्देशीय लोकांनी त्यांच्या कल्पनेतून उभी केली. या स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्या जागेची मागणी त्याकाळी लातूरची पेशकारी औशावरून चालायची, तिथले पेशकार सुजामत अली यांच्या मदतीने हैद्राबाद निजाम दरबारी मागणी पोहचवली व जागा उपलब्ध करून घेतली.. पुढे 1945 ला परदेशावरून आलेल्या फय्याजुद्दीन या वास्तूरचनाकाराच्या मदतीन कच्ची गोलाई पक्की झाली…!!

1905 ला लातूरला तहसील दर्जा मिळाला. त्यापूर्वी नळदुर्ग हे तहसील कचेरीचे ठिकाण होते. 1923 ला मिरज – लातूर रेल्वे सुरु झाली आणि लातूरची वाढ व्यापारी केंद्र म्हणून झाली… या व्यापारी पेठेची ख्याती देशभर पसरली. त्यातून गंजगोलाई आणि तीचे वैशिष्ट्य देशभर पसरले… गंजगोलाई हे लातूरच्या इतिहासातील सोनेरी पान आहे… आणि लातूरकरांच्या मनामनात गोलाई बद्दल अभिमान आहे. ते लातूरकरांच्या अभिमानाचे प्रतिक आहे… अशा या गंजगोलाईचा आज वर्धापन दिन आहे… चला लातूर संस्कृतीचा अभिमान ठेवू या… देशभर तो अधिक तेजाने पसरवू या…!!

(लेखक युवराज पाटील हे लातूर येथे जिल्हा माहिती अधिकारी आहेत. त्यांना ८८८८१६४८३४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल)

( Photo courtesy – लकी गहेरवार, लातूर )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here