छोट्या आतड्यांसह कॉनिया, हृदय मूत्रपिंडाचे दान

@maharashtracity

मुंबई: राज्य सरकारच्या जे जे रुग्णालयात (JJ Hospital) मुंबईतील १८ वे अवयवदान करण्यात आले. हृदय, कॉर्निया व मूत्रपिंडासह महत्वाचे म्हणजे छोट्या आतड्याचे दान (donation of small intestine) करण्यात आले. यामुळे सहा रुग्णांना जीवनदान मिळाले. अवयवदान व प्रत्यारोण समितीच्या नियमानुसार हे अवयवदान करण्यात आले. दरम्यान, कोविड महामारीनंतर सार्वजनिक रुग्णालयातील हे पहिले अवयवदान असल्याचे जे जे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ऍडव्होकेट रिना बनसोडे (४३) यांना जे. जे. रुग्णालयात १५ मे रविवारी दाखल करण्यात आले. यावेळी न्युरोसर्जरी विभाग प्रमुख डॉ. वेर्नान वेला यांच्या पथकांकडून उपचार सुरु करण्यात आले. मात्र १८ मे बुधवारी रात्री साडे दहा नंतर रुग्ण मेंदूमृत अवस्थेत (brain-dead) गेल्याचे घोषित करण्यात आले.

यावेळी रुग्णालयाच्या समाजसेवा विभागाकडून रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेऊन मेंदूमृत अवस्थेची कल्पना देऊन अवयवदानाचे (organ donation) महत्व सांगण्यात आले. कुटुंबियांनी देखील लगेचच परवानगी देत अवयवदानाचा मार्ग मोकळा केला.

त्यामुळे अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे आणि डॉक्टरांच्या टीमने अवयवदानाची प्रक्रिया लगेचच सुरु केली. यात रुग्णाचे मूत्रपिंड, कॉर्निया, हृदय तसेच छोटे आतडे यांचे दान करण्यात आले. मुंबईमधील जे.जे.हॉस्पीटल, ग्लोबल हॉस्पीटल, कोकीलाबेन हॉस्पीटल, नानावटी हॉस्पीटल अशा चार रुग्णालयातील गरजु रुग्णांना नियमानुसार अवयव दान करण्यात आले.

छोट्या आतड्याचे मुंबईत पहिल्यांदाच दान

महत्वाचे म्हणजे मुंबईतील हे पहिलेच यशस्वीरित्या झालेले छोटया आतडयाचे अवयवदान असल्याचे सांगण्यात आले. ग्लोबल रुग्णालयातील (Global Hospital) रुग्णाला छोटे आतडे देण्यात आले. या रुग्णाला छोटया आतड्याची निकडीची आवश्यकता होती. हे छोटे आतडे लगेचच मिळाल्यानंतर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्या रुग्णाला फायदा झाल्याचे सांगण्यात आले.

अवयवदान केल्यानंतर जे.जे. हॉस्पीटलच्या प्रथेप्रमाणे मयत रुग्णाला रुग्णालयातील सर जमशेदजी जीजीभॉय यांच्या पुतळयासमोर रात्रौ २.०० वाजता डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी मानवंदना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here