@maharashtracity

मुंबई: कोकणात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे (heavy rainfall) महाड, चिपळूण येथील औद्योगिक वसाहतीतील (MIDC) उद्योगांचे सुमारे अडीच हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई (Industries Minister Subhash Desai) यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर हा अंदाज काढण्यात आला.

एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी महाड (Mahad) व नवीन महाड औद्योगिक वसाहतीला भेट देऊन नुकासानीचा आढावा घेतला. महाड व नवीन महाड एमआयडीसी परिसरात सुमारे दोन हजार एकरवर पसरलेल्या औद्योगिक वसाहतीला पुराचा मोठा फटका बसला. या ठिकाणी दोन ते सव्वा दोन हजार कोटींचे नुकसान झाले आहे. अनेक उद्योगांची दालने पाण्याखाली गेल्याने मशिन, साहित्य व मालाचे नुकसान झाले. काही ठिकाणी तयार कच्चा पक्का माल वाहून गेला.

पी. डी. मलिकनेर यांनी चिपळूण (Chiplun) औद्योगिक वसाहतीतील नुकसानाची आढावा घेतला. येथील १६१ उद्योगांपैकी ५० उद्योगांचे नुकसान झाले. औद्योगिक वसाहतीमधील रस्ते, पूल वाहून गेले आहेत. पाणी पुरवठ्यावर देखील परिणाम झाला. काही ठिकाणी पाणी पुरवठा योजना बंद पडल्या. एमआयडीसी कार्यालयांत पाणी भरल्याने काही कागदपत्रे देखील भिजली आहेत. अनेक ठिकाणचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे एक दोन दिवसांत पूर्ण होतील.

काही उद्योगांनी विमा कवच घेतले. परंतु, विमा कंपन्याकडून उद्योजकांना कागदपत्रांची मागणी केली जात आहे. परंतु कागदपत्रे भिजल्याने ते देण्यात अडचण येत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांकडून भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी उद्योजकांना केल्या आहेत.

महापुराचा फटका एमआयडीसीच्या कार्यालयांना देखील बसला आहे. येथील अभियांत्रिकी विभागाचे कार्यालय पाण्याखाली गेले होते. त्यात अनेक नस्ती भिजल्या आहेत. त्या अद्यायावत करण्याचे काम सुरू झाले आहे. कार्यालयीन कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

“अतिवृष्टीमुळे महाड, चिपळूणसह कोकणातील उद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे. लवकरच सर्व नुकसानाची पंचनामे पूर्ण केले जातील. ज्यांनी विम्याचे संरक्षण घेतले आहे, त्यांना विमा कंपन्यांनी कागदपत्रांची मागणी न करता भरपाई द्यावी. अशा संकटात राज्य शासन देखील उद्योजकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून शक्य तितकी मदत करण्यात येईल.”

  • सुभाष देसाई
    उद्योग मंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here