@maharashtracity

दिवसभरात फक्त १६७ नवीन रुग्ण

मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णांचा (corona patients in Mumbai) आलेख घसरत असताना मृत्यूची संख्याही कमी होत असल्याचे आकडेवारी वरून समोर येत आहे. रविवारी मुंबईत आठवडाभरात चौथ्यांदा शून्य कोरोना मृत्यूची (zero death) नोंद करण्यात आली. तसेच रविवारी १६७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात २८६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याचे पालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबईतील (Mumbai) रुग्णांची संख्या घटते आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात २० हजारावर गेलेली रुग्णसंख्या रविवारी १६७ वर आली होती. म्हणजेच मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या २०० च्या आसपास स्थिरावत आहे. तसेच रुग्णसंख्येबरोबर कोरोनामुळे होणारे मृत्यूही कमी झाले आहेत.

महिनाभरात चारवेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत मृत्यूची संख्या १६,६८७ वर गेली आहे. तसेच कोरोना बाधित रुग्णांची संख्या १० लाख ५५ हजार ५६१ झाली आहे. तर रविवारी दिवसभरात २८६ जण कोरोना मुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत १० लाख ३४ हजार ४९३ रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत सध्या एक हजार ५११ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या घटल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी ३,०९७ दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्क्यांवर आणि रुग्णवाढीचा दर ०.०२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. दरम्यान, मुंबईत आढळलेल्या नव्या रुग्णांमधील १९ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील ५ जणांना ऑक्सिजनची (oxygen) गरज लागली, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.

राज्यात १ हजार ४३७ नवीन रुग्णांची नाेंद

राज्यात रविवारी १,४३७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,५८,४३१ झाली आहे. तसेच रविवारी ३,३७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ७६,९४,४३९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९७.९१ % एवढे झाले आहे.

राज्यात एकूण १६,४२२ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. तसेच राज्यात ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,७२,३२,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,५८,४३१ (१०.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०४,९४२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home quarantine) आहेत तर १०६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आजपर्यंत राज्यात एकूण ४४५६ ओमीक्राेनचे रुग्ण (omicron patients) आढळून आले असून यापैकी ३९८६ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ८९०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी (genome sequencing) पाठवण्यात आले असून त्यापैकी ७९९१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९१३ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here