महाड (रायगड): कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाड तालुका अध्यक्षपदी गंगाधर साळवी यांची निवड करण्यात आली. मावळत्या अध्यक्षा सौ स्नेहा सुनिल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
यावेळी कोमसाप केंद्रीय नियामक मंडळ सदस्या शोभाताई सावंत, कोमसाप रायगड जिल्हा अध्यक्ष सुधीर शेठ, कोकण साहित्य भूषण प्रभाकर भुस्कुटे, कोमसाप रायगड जिल्हा समन्वयक अ वि जंगम यांच्या प्रमुख मार्गदर्शन व निरीक्षणाखाली स्नेहा गांधी यांच्या निवासस्थानी या बैठकीचे अयोजन करण्यात आले होते.
कवी, शाहीर, लेखक म्हणून ओळखले जाणारे गंगाधर साळवी हे गेले १५ वर्षाहून अधिक काळ कोमसाप महाड शाखेचे क्रियाशील सदस्य आहेत. तसेच न्यू इंग्लिश स्कूल, वलंग या माध्यमिक विद्यालयात मराठी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने साहित्य व शिक्षण क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष- गंगाधर साळवी, उपाध्यक्ष- डॉ शीतल मालुसरे, सचिव- दीपक सकपाळ, सहसचिव- योगेश देवघरकर, खजिनदार गायत्री करमरकर, सदस्य शोभा शेठ, स्नेहा काळे, प्रिया शहा, रश्मी जंगम, अर्चना भागवत, मंगेश कंक, सुधीर सकपाळ, सल्लागार पदी सौ स्नेहा गांधी यांचा समावेश आहे.
कोमसाप जिल्हा प्रतिनिधी म्हणून नरेंद्र महाडिक यांची आणि युवा अध्यक्ष म्हणून संध्या पोटफोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जिल्हा प्रतिनिधी व सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
“कोमसापचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे साहित्यिक कार्य पुढे घेवून जाण्यासाठी आम्ही तरुण सज्ज आहोत. शाखेच्या सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या, जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आपण साहित्यिक चळवळ वाढविण्यासाठी प्रयत्न करु, त्यांच्या सूचनांचे पालन करू,” असे मनोगत नवनिर्वाचित अध्यक्ष गंगाधर साळवी यांनी व्यक्त केले.