@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) ७ ऑगस्ट रोजी एलपीजी टँकमधून मोठी गॅस गळती झाल्याप्रकरणी तातडीने चौकशी करून अहवाल स्थायी समितीला सादर करावा, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी पालिका प्रशासनाला दिले.

मुंबई महापालिकेच्या महत्वाच्या अशा कस्तुरबा रुग्णालयात ७ ऑगस्ट रोजी एलपीजी टँकमधून मोठी गॅस गळती (LPG gas leakage) झाल्याची धक्कादायक दुर्घटना घडली होती. त्यावेळी तेथील रुग्णालय प्रशासन, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, कर्मचारी आदींसह अग्निशमन दल यांनी सतर्कता दाखवत तात्काळ २० कोरोना रुग्णांसह ५८ रुग्णांना नजीकच्या दुसऱ्या रुग्णालयीन इमारतीमधील कक्षात सुरक्षितपणे नेऊन दाखल केले.

भयभीत झालेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आपत्कालीन परिस्थितीत मार्गदर्शन करून व त्यांना मोठा आधार देण्यात आला. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे या रुग्णांचे प्राण वाचले.

या गंभीर घटनेचे तीव्र पडसाद आज स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, या घटनेबाबत पालिका प्रशासनाने स्वतःहुन निवेदनपर माहिती का दिली नाही, असा सवाल उपस्थित करीत पालिका प्रशासणाला चांगलेच फैलावर घेऊन जाब विचारला.

तसेच, या गंभीर घटनेबाबत तातडीने चौकशी अहवाल सादर करण्याची मागणी रवी राजा यांनी केली. त्याची दखल घेऊन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, प्रशासनाला चांगलेच खडे बोल सुनावत सदर दुर्घटनेचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here