@maharashtra.city

गावातल्या छोट्या नागरिकांनी केलेल्या मागण्या जेव्हा गावं ऐकू लागतात, तेव्हा चमत्कार घडतात. महाराष्ट्रातील लातूर (Latur) जिल्ह्यातील नळगीर गाव क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या मुलींना कसे सक्षम बनवत आहे, यावर टाकलेला दृष्टीक्षेप.

महाराष्ट्रातील लातूर जिल्हा दुष्काळ आणि बालविवाह या समस्यांमुळे कुप्रसिद्ध आहे. महामारी आणि त्यानंतर झालेल्या संचारबंदीचा या भागात राहणार्‍या मुलींवर खोलवर परिणाम झाला. या भागात बालविवाह होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही आढळून येते. अग्रगण्य बाल हक्क स्वयंसेवी संस्था, बाल हक्क आणि आपण – CRY, आपल्या भागीदारांसह सामाजिक तळागाळात अनेक बालविवाह रोखण्यात यशस्वी झाली आहे, परंतु बालविवाहाची समस्या अजूनही एक यक्षप्रश्न म्हणून सर्वांसमोर उभी ठाकली आहे.

अशाच एका उपक्रमात, लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील नलगीर गावात, CRY आपल्या भागीदारांच्या माध्यमातून सकारात्मक मार्गाने मुलींना सक्षम करण्यासाठी क्रिकेटचा (cricket) वापर करीत आहे. खेड्यातील शाळकरी मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी शाळेच्या मैदानावर अधिक तासांचा विशेष हक्क असावा, या विद्यार्थींनीच्या मागणीस नळगीर ग्रामपंचायतीने होकार दिला.

दैनंदिन जीवनातील अडथळे दूर करणे, सहभागाला चालना देणे, दृष्टिकोन बदलणे तसेच सामाजिक बांधिलकीच्या भावनेला उत्तेजित करण्याचा एक व्यायाम म्हणून खेळाकडे पाहिले जाते. नलगीरमधील अनेक मुलींचा असा दावा आहे की ते क्रिकेटचे उत्सुक चाहते असून आवर्जून सगळे खेळ पाहतात. परंतु, जोपर्यंत CRY ने गावात आपल्या उपक्रम केंद्राद्वारे खेळ सुरू केले नाही तोपर्यंत त्यांनी स्वत: खेळण्याचा कधी विचारही केला नव्हता. किशोरवयीन मुलींचे सबलीकरण करण्यासाठी CRY च्या कामाचा एक भाग म्हणून किशोरवयीन मुली आणि पंचायत सदस्य यांच्यात झालेल्या संवादादरम्यान, अनेक मुलींनी गावप्रमुखांना विनंती केली की त्यांनाही क्रिकेट खेळण्याची समान संधी देण्यात यावी. या संवादादरम्यान उपस्थित असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आपली संमती दर्शवून, खेळताना सुरक्षेच्या सर्व उपाययोजना आणि खबरदारीचे पालन करू, असे आश्वासन मुलींकडून घेण्यात आले.

आपणही क्रिकेट खेळावे हे मुलींच्या कसे ध्यानात आले?

इयत्ता नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय अपूर्वा नागदर्गेच्या मते, मुली आणि मुले खेळत असलेल्या खेळांमध्ये स्पष्ट फरक होता.

“आम्ही मुली जे खेळ खेळायचो, त्यातले बरेचसे खेळ फक्त बैठे किंवा घराजवळच असत. आम्ही क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉलसारखे खेळ फक्त दूरदर्शनवरच पाहत आलो,” ती पुढे सांगते की, CRY च्या पाठिंब्याने गावात त्यांचे एक उपक्रम केंद्र स्थापन झाले होते. “संगणकाव्यतिरिक्त, ज्या गोष्टीने आमचे लक्ष वेधले ते म्हणजे तेथे उपलब्ध असलेले क्रीडा साहित्य. जसे आम्ही केंद्रात जायला सुरुवात केली, तसे तेथील शिक्षकांनी आम्हाला क्रिकेट किटसारखी अनेक खेळांची उपकरणं दिली, जे वापरण्याचा आम्हाला कधी योगच आला नव्हता. तिने सर्व मुलींची संघांमध्ये विभागणी केली व केंद्रासमोर उपलब्ध असलेल्या जागेत खेळ सुरू झाला. 

एकदा शिक्षकाने आम्हाला भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजबद्दल सांगितले की ती १०,००० धावा करणारी पहिली महिला क्रिकेटपटू असून जवळजवळ २३ वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे, तेव्हा आमच्या लक्षात आले कि, क्रिकेट हा केवळ मुलांसाठीचा खेळ नाही तर आम्हीदेखील हा खेळू शकतो आणि थोडे अधिक गंभीरपणे खेळू लागलो.”

अपूर्वा पुढे सांगते की, त्यांच्याकडे १३ मुलींचा एक समर्पित संघ आहे जो हा खेळ खेळत आहे.

‘आमच्या संघाला रॉयल गर्ल्स म्हणतात. यापूर्वी आम्हाला कसे खेळायचे हे माहित नव्हते, परंतु नियमित सरावाने आम्हाला आत्मविश्वास मिळाला. सांघिक खेळ खेळण्याचा हा आत्मविश्वास आम्हाला दबावाचा सामना करण्यास देखील मदत करत आहे,” ती हसत हसत पुढे सांगते.

संघातील सदस्यांचे वय १४ ते १८ वर्षे आहे. 

आठवीत शिकणारी १४ वर्षीय संकृती सोनकांबळे सांगते, “जेव्हा आम्ही क्रिकेटला सुरुवात केली तेव्हा प्रशिक्षक नव्हते. पण कम्युनिटी ऑर्गनायझर मनोज सर आणि केंद्रातील आमच्या शिक्षकांच्या मदतीने आम्ही काही मूलभूत गोष्टी शिकलो. सुरुवातीला आमच्याकडे फेकलेला चेंडू आम्ही पकडू शकलो नाही किंवा बॅट कशी पकडायची हे देखील माहित नव्हते. गोलंदाज म्हणून खेळावं असं वाटणाऱ्या काही मुलींनी फेकलेला चेंडू फलंदाजी करणाऱ्या व्यक्तीपर्यंतही पोहोचत नव्हता म्हणून मनोज सरांनी गोलंदाज म्हणून जबाबदारी स्वीकारून मुलींसाठी गोलंदाज आणि फलंदाजामधील अंतर कमी केलं. अशा सुरुवातीनंतर आम्ही दररोज किमान एक तास तरी खेळण्यासाठी राखून ठेवण्याचे ठरवले. सर्वांनी क्रिकेटपटूंना दूरदर्शनवर सराव करताना जसे पहायचे तसे खेळण्याचा प्रयत्न केला, पण ते काही आम्हाला लगेच जमले नाही” ती सांगते.

बऱ्याच मुलींनी कबूल केले की कधीकधी ते जागेच्या कमतरतेमुळे शेतात खेळायला जात असत व त्यांना बघ्यांचे टोमणे ऐकावे लागत, ज्यांना मुलींनी खेळणे अवाक् करून सोडत असे. तरीही त्यांचे म्हणणे आहे की खेळाबद्दलच्या उत्कटतेने त्यांना सर्व टोमण्यांकडे दुर्लक्ष करता आले.

मुलींना या खेळाचा गांभीर्याने पाठपुरावा करताना पाहून तालुका स्तरावर हौशी व अर्धव्यावसायिक दर्जाचे क्रिकेट खेळणाऱ्या अविनाश केशव गायकवाड यांनी स्वेच्छेने मुलींना प्रशिक्षण दिले. त्यामुळे यंदा मार्चपासून त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन मिळू लागले आणि त्यांचे क्रिकेटही सुधारू  लागले आहे.

गावातल्या मुलांना याबद्दल काय वाटतं?

अनेक मुलींनी सांगितले की, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा मैदानावर खेळायला सुरुवात केली, ज्याचा वापर मुले क्रिकेट खेळण्यासाठी करत, तेव्हा त्यांच्याकडून आपसूकच प्रतिक्रिया उमटली. “गोष्टी थोड्या अस्वस्थ झाल्या, “या मुली क्रिकेट का खेळत आहेत, त्या ‘वर्ल्ड कप’ जिंकणार आहेत का? असे टोमणे मारले गेले, परंतु आम्ही हार न मानता, मैदानावर खेळण्याच्या मिळालेल्या परवानगीचा पुरेपूर फायदा घेतला. लवकरच मुलांकडून काही सकारात्मक बोल ऐकू येणे सुरे झाले आणि त्यांच्या वागणुकीत बदल दिसून आला. आता आम्ही म्हणू शकतो की जास्तीत जास्त लोक आमच्या खेळाबद्दल सकारात्मक बोलत आहेत,” असे 16 वर्षीय शीतल पवार सांगते.

या परिवर्तनामुळे, विशेषत: मुलींचा क्रिकेट संघ तयार झाल्याने सर्वच मुले खूश नाहीत. हा मुलींचा खेळ नाही, असे काहींना वाटते. काहींचे असे म्हणणे आहे की इतर समाजातील मुले विशेषत: क्रिकेट खेळण्यास आणि खेळाच्या मैदानाचा वापर करण्यास विरोध करतात.

गावातील रहिवासी रितेश सोनकांबळे यांच्या मते, मुलींचे जर नियम आणि इतर तांत्रिक गोष्टींचे ज्ञान वाढले तर त्यांचा खेळ सुधारण्यास मदत होईल. त्यांचे मित्र अखिलेश कांबळे म्हणतात, “आम्ही स्वतःसाठी कधीही प्रशिक्षकाची नेमणूक केली नाही, परंतु मुलींच्या संघाचा स्वतःचा क्रिकेट प्रशिक्षक आहे. मला माहित आहे की ते चांगले खेळत आहेत, परंतु त्यांच्याकडे तालुका आणि जिल्हा स्तरावर स्पर्धा नाहीत. कोणत्याही स्पर्धेशिवाय ते कसे वाढतील आणि त्यांची योग्यता सिद्ध करतील?”

प्रशिक्षक अविनाश म्हणतात, “मी गेल्या आठवड्यात मार्च 2022 पासून या मुलींचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करत आहे. सर्वांना खेळाची आवड आहे, त्यांना खेळायचे आहे, त्यामुळे मी त्यांना या खेळात मार्गदर्शन करणार आहे, जे मी माझे कार्य समजतो. गावात पुरुष मुलींना शिकवतो, याबाबत चर्चा होतील म्हणून मुलींना केवळ उपक्रम केंद्राच्या शिक्षिका आणि महिला समुदाय आयोजक यांच्या उपस्थितीत शिकवले जाणार आहे. या महिलांनाही प्रशिक्षण मिळते व त्या इतर किशोरवयीन मुलींना क्रिकेट शिकवण्यास पात्र आहेत.”

‘ग्रामीण भागातील मुलींकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. आज अनेक मुली आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळत आहेत. माझा असा विश्वास आहे की आमच्या गावातील मुलींनीही हा खेळ शिकला पाहिजे आणि जिल्हा स्तरावर आयोजित केलेल्या स्पर्धा जिंकल्या पाहिजेत.”

CRY – वेस्टचे डेव्हलपमेंट सपोर्टचे जनरल मॅनेजर कुमार निलेंदू म्हणतात की जेव्हा सर्वजण मुलांच्या हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी एकत्र येतात तेव्हा आश्चर्यकारक गोष्टी घडू शकतात आणि ही घटना याचे एक उत्तम उदाहरण आहे!  ते म्हणतात, “स्थानिक पंचायतीमुळे मुलींना क्रिकेट खेळणे शक्य झाले, ही वस्तुस्थिती इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना (local body) मुलांच्या भावी उन्नतीसाठी कार्य करण्यास प्रवृत्त करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here