@maharashtracity
जागतिक बेघर निवारादिनानिमित्ताने बेघरांची आरोग्य तपासणी
बेघरांचे होणार सर्व्हेक्षण
पालिका निवारा केंद्रात ७२७ बेघरांचे वास्तव्य
बेघर व्यक्तींसाठी १८००२२७५०१ हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक
बेघरांसाठी माहूलमध्ये १५०० व्यक्ती क्षमतेचे निवारा व कौशल्य प्रशिक्षण केंद्र लवकरच
मुंबई
जागतिक बेघर निवारादिन १० ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो यानिमित्ताने मुंबई महापालिका रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजारपेठा, प्रार्थनास्थळं इत्यादी ठिकाणी बेघरांचे सर्व्हेक्षण करून त्यांच्यासाठी एक विशेष धोरण लवकरच बनवणार आहे. (BMC to draft policy for homeless)
या धोरणाअंतर्गत बेघरांना स्वावलंबी बनविण्याचा पालिकेचा मानस असून बेघरांच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन त्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील. त्यांना अधिकाधिक सेवासुविधा देण्यात येणार आहेत.
पालिकेने या जागतिक निवारा दिनानिमित्त, निवारा केंद्रांत आरोग्य तपासणी, मास्क व सॅनिटायझर वाटपाचे आयोजन केले होते. तसेच, मुंबईतील बेघर व्यक्तींच्या मदतीसाठी १८००२२७५०१ हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक जारी केला आहे. त्यामुळे या बेघरांना अपेक्षित मदत वेळेत देण्याचा प्रयत्न पालिकेतर्फे करण्यात येणार आहे. (BMC has activated toll free number for homeless)
मुंबईतील बेघरांसाठी धोरण तयार झाल्यावर त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, बेघरांसाठी माहूलमध्ये १५०० व्यक्ती क्षमतेचे निवारा व कौशल्य प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
यासंदर्भातील माहिती सहायक आयुक्त (नियोजन) किरण दिघावकर यांनी दिली आहे.
पालिकेच्या निवारा केंद्रात सध्या ७२७ बेघरांचे वास्तव्य
न्यायालयाने फटकारल्यानंतर मुंबई महापालिकेने बेघरांसाठी अधिक सेवासुविधा बहाल करण्यास जलदगतीने हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या पालिकेच्या प्रौढांसाठीच्या १२ बेघर निवारा केंद्रांत २३९ व्यक्ती (क्षमता ३४२) तर १८ वर्षांखालील मुलांच्या बेघर निवारा केंद्रामध्ये ४८८ बेघर ( क्षमता ५९०) वास्तव्याला आहेत. (Shelter homes)
१५०० बेघरांच्या क्षमतेचे निवारा व कौशल्य प्रशिक्षण केंद्र लवकरच
मुंबईतील सध्या अस्तित्वात असलेली निवारा केंद्रे अपुरी पडल्यास पर्यायी केंद्र उभारण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेतर्फे माहुल येथे १५०० बेघरांची क्षमता असलेले निवारा केंद्र व कौशल्य प्रशिक्षण केंद्र लवकरच उभारण्यात येणार आहे.
हे मोठे निवारा केंद्र उभारल्यानंतर मुंबईत किमान दोन ते अडीच हजार बेघरांच्या निवाऱ्याची व्यवस्था होणार असून त्यांना उन्हाळा, पावसाळा व हिवाळा अशा तिन्ही ऋतूत सर्व सेवासुविधांनी युक्त असे डोक्यावर सुरक्षित छत्र उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे मुंबईतील बेघरांना एकप्रकारे मोठा दिलासा मिळण्यास मोठी मदत मिळणार आहे. तसेच, बेघर निवारा केंद्रांची संख्या आणखीन वाढविण्यासाठी चांदिवली, दहिसर, अंधेरी, गोवंडी या ठिकाणी लवकरच आणखी ४ निवारा केंद्र कार्यान्वित होणार आहेत.
टोल फ्री क्रमांक
बेघरांना काही मदत पाहिजे असल्यास त्यांच्या मदतीसाठी १८००२२७५०१ हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक ११ ऑक्टोबर २०२१ पासून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये कार्यरत होणार आहे.