@maharashtracity
दादा, पहाटेच्या शपथेची गोष्ट विसरून हल्ली मिडिया खुल्या दिलाने तुमचं कौतुक करत आहे. हल्लीच वाचलं की पाऊस असल्याने तुम्ही गार्ड ऑफ ऑनर स्विकारला नाही. आनंद झाला वाचून. पण त्याच वेळी बीडमध्ये कोरोनायोद्धा परिचारिका व आरोग्य सेविका न्याय मागत असतांना त्यांच्यावर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज झाला. यावर आपण काहीच बोलला नाहीत दादा…
‘उपमुख्यमंत्री’ या ‘असंवैधानिक’ पदावरून तुम्ही घेतलेले निर्णयही कौतुकास्पद आहेत. इंग्लंड, अमेरिका, साउथ अफ्रिकेचे दाखले देत तुम्ही नागरिकांना घरात रहायला भाग पाडताय. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेली पंढरपुरची वारीही तुमच्या आदेशानुसार प्रतीकात्मक रुपात काढण्यात येणार आहे. तुमचे पोलिस बंद गाड्यातल्या लोकांना अडवून दंड करत आहेत. तुमच्या विरोधकांना तुम्ही पोलिसांकरवी अटकाही करवत आहात. चांगली गोष्ट आहे दादा.
पण सामान्य लोकं कंटाळून कधीमधी घराबाहेर पडली, तर सतराशे निर्बंध लावणारे तुम्ही पुण्यातल्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या उद्घाटनासाठी इतकी गर्दी जमवली आणि सर्व केल्याकरवल्यावर् पाणी टाकलं.
सकाळच्या बैठकीत ‘पुणेकरांनी गर्दी केली, तर आणखी कडक लॉकडाउन लावू,’ असा थेट इशारा देत, करोनाची तिसरी लाट येणार हे सांगताना, स्वतःच्या पक्षातल्या लोकांची अशी गर्दी जमा करून कुटुंबातल्या कुटुंबातच शक्तीप्रदर्शन करायला लागावं हे तुमच्यासारख्या धोरणी नेत्याला शोभत नाही.
- नीता ढमाले
नंदादीप प्रतिष्ठान
पुणे