@maharashtracity

मुंबईत मनपाने 8 पेंग्विनसाठी मोजले होते फक्त 17 कोटी

मुंबई: मुंबईतील पेंग्विन खरेदी, त्यांचे नामकरण आणि त्यावर होणाऱ्या खर्चावरून मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपला महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी आज तोंडघशी पाडले आहे.

भाजपशासित गुजरातच्या अहमदाबाद येथील सायन्स सिटीमध्ये (Science City, Ahmedabad) ठेवण्यासाठी आणलेल्या 6 पेंग्विनसाठी (Penguins) तब्बल 264 कोटी रुपये खर्च केल्याची आणि त्या तुलनेत मुंबई मनपाने राणीच्या बागेत (Rani baug) ठेवण्यासाठी 8 पेंग्विन आणले आणि त्यावर फक्त 17 कोटी रुपये मोजले होते अशी आकडेवारी जाहीर करून महापौर पेडणेकर यांनी भाजपचा (BJP) आवाज बंद केला आहे.

“मुंबईत एका पेंग्विनचा मृत्यू झाला तर गुजरातमध्ये एक पेंग्विन गायब आहे. त्याचे नेमके काय झाले, माहित नाही. मात्र, मुंबईतील पेंग्विनच्या खरेदी व देखभालीवरील खर्चावरून आकांडतांडव करीत बेंबीच्या देठापासून कोकलणारे, घाणेरडे राजकारण करणारे भाजपवाले गुजरातमधील पेंग्विन प्रकरणाबाबत गप्प का,” असा सवाल उपस्थित करीत महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेतील भाजप नगरसेवक, गटनेते, यांसह भाजपचे राज्यस्तरीय नेते यांना चांगलेच फटकारले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांचा व भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमधील प्राणी संग्रहालयात जाऊन व तेथील पेंग्विन कक्षातील पेंग्विनची खरेदी, त्यासाठी झालेला खर्च, तिकीट विक्री आदींबाबत सखोल माहिती काढून त्याची मुंबईत पोलखोल केली.

भाजपच्या ‘त्या’ नेत्यांना ‘गुजरात पेंग्विन’ म्हणायचे का ?

पेंग्विनवरून भाजप नेत्यांनी जसे घाणेरडे राजकारण केले तसे घाणेरडे राजकारण मला करायचे नाही. मात्र, भाजप नेत्यांनी राणीबागेतील पेंग्विन खरेदी व देखभाल यांवरून शिवसेना युवा नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे आम्ही मग गुजरात अहमदाबाद येथील सायन्स सिटीमधील पेंग्विन खरेदी, तिकीट शुल्क यांबाबत माहिती घेतली. त्याची मुंबईसह तुलना करून अभ्यास केला. त्यावरून मुंबईपेक्षा गुजरातमध्ये पेंग्विन खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असून तिकीट शुल्कही जास्त घेतले जाते, अशी माहिती देत महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला फैलावर घेतले.

आता गुजरात अहमदाबाद येथेही पेंग्विन आणल्याने भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांना ‘गुजरात पेंग्विन’ म्हणायचं का, असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.

मुंबईत राणीच्या बागेत २५ ते ५० रुपये शुल्क घेऊन संपूर्ण राणीबागेत फिरता येते. लहान शाळेतील मुलांना ५० रुपये घेतले जातात. याउलट मुंबईत राणीबागेत दिव्यांग, सिनीयर सिटीझन यांना मोफत प्रवेश आहे. गुजरातमध्ये अशी मोफत सुविधा कुणालाही नाही. राणीबागेत २४ तास तज्ञ डॉक्टर कर्मचारी असतात. गुजरातमध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम नाही.

गुजरातमधील पेंग्विन कक्षात जे डॉक्टर आहेत ते देखील मुंबईतूनच आपल्याकडचा अनुभव घेऊन तिकडे गेले आहेत. गुजरातमधील पेंग्विन कक्ष उभारण्याकरता मुंबईचीच मदत घेतली गेली असे महापौरांनी सांगितले.

पेंग्विन मुद्द्यावर आशिष शेलार यांच्यासमोर वन टू वन चर्चा करा असे भाजपचे लोक मला उपदेश देतात. आशिष शेलार माझ्याबद्दल जे काही बोलले आहेत त्याबद्दल त्यांनी आधी सर्व महिलांची मागावी, असे आव्हान महापौर यांनी शेलार आणि भाजपाला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here