@maharashtracity

By विजय साखळकर

हाजी मस्तान मिर्झा (Haji Mastan) अंतिम काळात फार आजारी होता. त्याचे मित्रांशी संबध होते पण सार्वजनिक जीवनात तो जवळ जवळ दिसत नव्हता. एके दिवशी त्याचं निधन झाल्याची बातमी आली. पण एखाद्या राजकीय नेत्यांच्या निधनानं येते तशी शोककळा त्याच्या निधनानंतर मुंबईवर पसरली होती. दलित मुस्लिम सुरक्षा संघाचा (Dalit – Muslim – Suraksha Sangh) चिटणीस सुंदर शेखर त्यावेळी डाॅली मिस्त्रीच्या गळ्यात पडून हमसाहुमशी रडत होता.

डाॅली मिस्त्री कोण? सुंदर शेखर कोण? या दोघांनाही भेटण्याची संधी मला विठ्ठल डैम्पोमुळे मिळाली. डॉलीचं (Dolly Mistry) ग्रॅंटरोड (Grant road) परिसरात गॅरेज होतं आणि त्याच्या कार्यालयात मस्तानचा पोस्टर टाईप भव्य फोटो फ्रेम करून लावला होता. “यह हमारे मायबाप है”, असं डाॅली त्यावेळी म्हणाला होता. आता डाॅली हयात नाही. कार अपघातात त्याचा मृत्यू झाला.

सुंदर शेखरची (Sunder Shekhar) गोष्टच वेगळी होती. सुंदर शेखरला मस्ताननं उचलून आणला आणि त्याला आपला मुलगा मानलं. त्याचं भवितव्य घडवलं. मस्ताननं मानलेला दुसरा मुलगा विक्की. तो मस्तानच्या हयातीतच गेला. मस्तानला तीन मुली. त्यामुळे सुंदरवर त्याचा जीव होता.

मस्तानचं निधन झाल्यावर त्याच्या संपत्तीविषयी अनेक अफवा उठल्या आणि निवळून गेल्या. फार मोठ्ठं घबाड हाती लागेल या हेतूने काही पत्रकारांनी उत्खननही सुरू केले पण कुणाच्याही हाती काही लागले नाही.

सुंदर शेखर हा मस्ताननं त्याच्या राजकीय पक्षाचा वारसदार म्हणून आधीच घोषित केला होता. मस्तानच्या तीन मुलींनी सुंदर शेखरला पाॅवर ऑफ अटर्निही दिली होती. पुढे त्यांच्यात काही मतभेद झाले व सुंदर शेखरवर त्यांनी न्यायालयात (court) दावा केला होता.

Also Read: मस्तान राजकारणात..

मस्तानच्या’ ‘मुलगा’ मानण्याच्या रीतीचा दीपक भाटिया (Deepak Bhatia) यांनी एक उल्लेख केला होता. त्यानुसार मस्तान कुणाच्याही पाठीवर थाप मारत असे आणि कुणाच्याही खांद्यावर हात टाकून, ‘तू तो मेरा बेटा है’, असं म्हणत असे.

पण सुंदर शेखर हा त्याचा खरोखरी मानलेला मुलगा होता. त्याच्याबरोबर तो असे. दलित मुस्लिम सुरक्षा महासंघाचा कारभार मस्तानच्या पश्चात तोच सांभाळत असे.

मस्तानच्या एकूण सवयीनुसार त्यानं खरेदी केलेल्या जमीन- जुमल्याचा हिशेब-ठीशेब होता. पण चॅरिटी म्हणून अनेकांना स्वत:च्या जबाबदारीवर पैसे देत असे- धंदा व्यवसाय उभा करण्यासाठी. त्याचा हिशोब फक्त त्याला माहीत असे. कोणतीही लिखापढी नसे. दीपक भाटिया यांची हुन्नर ओळखून त्याला जागा दिली होती. तसेच तडफदार लोकांना तो भांडवल पुरवत असे.

मस्तानची ही फार जुनी सवय होती. जेव्हा चिक्कीच्या धंद्यात त्याला चार पैसे जास्त मिळू लागले तेव्हा तो गरजू मित्रांना उसने पैसे देत असे. मालदार झाला तेव्हाही त्याच पद्धतीने तो पैसे देत असे.

तस्कर (smuggler) नसतेवेळी तो मदत करी तशीच मदत एरवीही करू लागला. एखादा तरुण व्यवसायात प्रगती करेल असं वाटलं की मस्तान आपणहून त्याला मदत करायचा.. ती या रीतीनं सांगून….. देख … पैसा मेरा है… मेहनत तेरी…. लेकिन राॅयल्टी लूंगा…. धंदा तेरा रहेगा… मै कैसा चल रहा है देखने आऊंगा नही। मै फकिर नही…. मतलब मैने पुंजी दी है…. उसके बदलेमे तू देते रहना…..।

या संपत्तीचं पुढे काय झालं ते कुणालाच कळलं नाही. कारण ते फक्त मस्तानला माहीत होतं आणि हा खजिना मस्ताननंतर मोजणारा कुणी नाही. मस्तान त्याच्या चाव्या बरोबर घेऊन गेला.

(लेखक विजय साखळकर (Vijay Sakhalkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here