जमिएत उल्मा ए हिंद संघटनेकडून बांधून दिलेल्या घरांचा नागरिकांना ताबा

महापुरात कोसळलेल्या ४५ घरांची पुनर्बांधणी

@maharashtracity

By Milind Mane

महाड: गेली १०२ वर्षे आपल्या स्थापनेपासून जमिएत उल्मा ए हिंद (Jamiat Ulama e Hind) ही संघटना मानवता धर्म समजून हिंदु – मुस्लिम समाजामध्ये प्रेम एकता जपण्याचे काम करीत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून देशातील काही राज्यात सुरू असलेला जातीय तणाव (communal tensions) दुर्दैवी असून दोन समाजामधील निर्माण केलेल्या व्देषावर केवळ प्रेम व सौहार्दपूर्ण विचारांनीच आपण मात करू शकतो, असे प्रतिपादन जमिएत उल्मा ए हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना सय्यद अर्शद मदनी यांनी महाड येथे केले.

जमिएत उल्मा ए हिंद या संघटनेच्यावतीने चिपळूण (Chiplun) व महाडमधील (Mahad) महापुरात बाधित झालेल्या पूरग्रस्तांना नवीन घरे बांधून देण्यात आली. महाडमध्ये जवळपास ४५ घरांची बांधणी या संघटनेकडून केली. महापुरात (flood) महाडमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. यामध्ये मुस्लिम संघटनांनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती. जमियते उल्मा ए हिंद या संघटनेने हिंदू – मुस्लिम भेद न करता दोन्ही समाजातील ४५ कुटुंबाना त्यांना हक्काची घरे बांधून दिली. या बांधण्यात आलेल्या घरांचा लोकार्पण सोहळा आज पार पडला.

या सोहळ्याला जमियते उल्मा ए हिंद या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना सय्यद अर्शद मदनी, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, जमियत उलमा ए हिंदचे हाफीज जाकीर, उस्मान कारभारी, खारुद नदवी, हनीमुल्ला कासमी, जमियत उलमा ए रायगड चे अध्यक्ष डॉ. मैनुद्दीन हसन चौधरी, सेक्रेटरी मुक्ती अजगर खोफटकर, आणि मौलाना अब्दूल सलाम जलाल आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनीही मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे सांगत आपत्ती काळात शासनाचे अगोदर मुस्लिम संघटना मदतीसाठी पोहोचल्या होत्या, असे सांगितले. त्यांनी केलेले काम तमाम रायगडवासी कधीच विसरणार नाहीत असे स्पष्ट केले.

तर आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogawale) यांनी जमियते उल्मा ए हिंद या संस्थेने गरिबांना दिलेली घरांची भेट ही आयुष्य भराकरिता लक्षात राहणारी ठरेल, असे गौरवोद्गार काढले. समाजातील श्रीमंत वर्गाला मदत करणारे अनेक असतात. मात्र, गरिबांना केलेली मदतच महत्त्वपूर्ण ठरते. त्यांच्या पाठीशी ईश्वर कायम असतो याचा अनुभव आपण गेल्या पंधरा वर्षांपासून घेत असून जनतेने आपल्यावर केलेले प्रेम हीच आपल्या कार्याची पोचपावती आहे, असे देखील गोगावले यांनी सांगितले.

महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी जमियत उलमा ए हिंद संस्थेने केलेले काम म्हणजेच आपल्या देशाची व महाराष्ट्राची संस्कृती असल्याच्या शब्दांत संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

याप्रसंगी आपल्या छोटेखानी मनोगतामध्ये संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी देशात सध्या सुरू असलेल्या हिंदू – मुस्लीम समाजातील तणावाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून ही देशाच्या फायद्याचे नसल्याचे मत व्यक्त केले. सध्या दोन समाजामध्ये निर्माण केलेल्या विरोधावर केवळ प्रेम भावनेनेच व सौहार्दानेच मात केली जाऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाड चिपळूणमध्ये केलेली घरांची मदत ही आपली कर्तव्यपूर्ती असून यापूर्वी आपण बंगाल, केरळ, कर्नाटक या राज्यांतही अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये तेथील नागरिकांना सहकार्य केले असल्याची माहिती दिली. दोन समाजामध्ये निर्माण होणार्‍या तणावाने देश समृद्ध होणार नसून देश बरबाद होईल अशी भीती व्यक्त केली.

जमियत उलमा ए हिंदचे सेक्रेटरी हनीमुल्ला कासमी यांनी महाप्रलय व कोरोना काळात या संस्थेने सुमारे १ कोटी १४ लाखाचे जीवनावश्यक वस्तु व इतर संसारोपयोगी वस्तुंचे वाटप केले. तर महाड चिपळूणमध्ये ४५ घरांसाठी दीड कोटीची मदत केली. या ४५ घरांपैकी २२ घरे हिंदू बांधवांना महाड पोलादपूरमध्ये बांधून दिली असून उर्वरित घरे मुस्लीम समाजाच्या लोकांना दिल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here