@maharashtracity

महाडमध्ये आपत्कालीन स्थितीत हेलिकॉप्टर उतरणार कुठे ?

पंचतारांकित एम आय डी सी रद्द करण्यात कोणाचे हित?

महाड: महाड औद्योगिक वसाहतीमधील (Mahad MIDC) हेलिपॅड नव्याने उभ्या रहात असलेल्या एका रासायनिक कंपनीला विकली गेल्याने सद्य स्थितीत आपत्कालीन स्थितीत किंवा विविध क्षेतातील मान्यवर नेत्यांच्या आगमनासाठी हेलिकॉप्टर उतरणार कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाड औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र (Five Star Industrial Complex) उभे केले जाणार होते. याकरिता जागा भूसंपादन (land acquisition) करून प्लॉट देखील पाडण्यात आले. एकूण १०० हेक्टरवर हे पंचतारांकित औद्योगिक उभे राहिले आहे. २३.९३ हेक्टर यामध्ये जवळपास २४ प्लॉट पाडण्यात आले.

याचबरोबर भूमिगत विद्युत व्यवस्था, पदपथ, हेलिपॅड, दूरध्वनी, पाणीपुरवठा योजना, पोलीस चौकी, आदी कामांचा आणि सुविधांचा यामध्ये समावेश होता. या क्षेत्राकरिता सन १९९९ पर्यंत जवळपास 13 कोटी 32 लाख ४६ हजार रुपये खर्च करण्यात आला. हे हेलिपॅड गेली अनेक वर्ष वापरात आले. मात्र पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात शासनाने स्वारस्य न दाखवल्याने हे क्षेत्र ओसाडच राहिले आहे.

यामुळे पंचतारांकितचा दर्जा शासनाने काढून घेतला. यामुळे कांही महिन्यापूर्वी हे हेलिपॅड देखील या परिसरात येणाऱ्या एका कंपनीला विकण्यात आले आहे.

महाड आमशेत गावानजीक हे हेलिपॅड (Helipad) आहे. याच ठिकाणी ओरिएन्ट ऑरोमॅंटिक अँड सन्स लिमिटेड या कंपनीचे काम सुरु आहे. जी जागा कंपनीने घेतली आहे त्या जागेतच हेलिपॅड बांधण्यात आले आहे. या हेलिपॅडचा वापर ज्या ज्या वेळी महाडमध्ये आपत्कालीन स्थिती उद्भवली त्या त्या वेळेस वापर झाला आहे.

महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते याच हेलिपॅडवर उतरले आहेत. कांही दिवसांपूर्वी महाड नगर पालिकेच्या उद्घाटन सोहळ्यास मंत्री आले असता स्थानिक प्रशासन हेलिपॅड आरक्षित करण्यासाठी एम.आय.डी.सी. कडे गेले असता हेलिपॅड बंद झाले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अन्य ठिकाणी हेलिपॅड बनवण्यात आले.

महाड हे संवेदनशील आणि ऐतिहासिक शहर आहे. याठिकाणी वारंवार नैसर्गिक प्रकोपाच्या (natural disaster) घटना घडल्या आहेत. अशा वेळी हेलिपॅड असणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाला न कळवताच हे हेलिपॅड बंद केल्याने अडचण निर्माण झाली आहे.

याबाबत एम.आय.डी.सी.चा कोणताच अधिकारी माहिती देण्यास तयार नाही. प्रादेशिक अधिकारी बोंबाळे यांनी देखील विभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधा असे सांगितले.

महाड औद्योगिक क्षेत्र हे रासायनिक झोन (chemical zone) म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर याठिकाणी आलेल्या कंपन्यांनी रासायनिक प्रकल्प उभे केले. यातून होणाऱ्या प्रदूषणाचे (pollution) विपरीत परिणाम आजही सुटलेले नाहीत. यामुळे पंचतारांकित औद्योगिक क्षेत्राची संकल्पना पुढे आली.

याठिकाणी अभियांत्रिकी, रबर, प्लास्टिक, यांत्रिक अशा उद्योगांना चालना मिळणार होती. मात्र, या सर्व कल्पना आणि स्वप्नांवर अवघ्या कांही काळातच पाणी फिरले.

तत्कालीन उद्योगमंत्री लीलाधर डाके आणि उद्योग राज्यमंत्री प्रभाकर मोरे यांनी या पंचतारांकित आणि अतिरिक्त औद्योगिक क्षेत्राचे उद्घाटन केले होते. शासनाने या पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रावर केलेला खर्च पूर्णपणे वाया गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here