@maharashtracity

सेल्फ किट टेस्ट सरकारी यंत्रणेशी जोडा

इंडियन मेडिकल असोसिएशनची सुचना

मुंबई: सेल्फ टेस्ट किटमधून चाचणी केलेले रुग्ण अहवालाची नोंद मोबाईलमधून सरकारी वेबवर करत नसल्याने रुग्ण नोंद होत नाही. त्यामुळे सेल्फ टेस्ट किट बारकोड किंवा कोणत्याही युनिक पद्धतीने सरकारी यंत्रणेशी जोडले गेल्यास सरकारी वेबवर रुग्णनोंद सहज होऊ शकते, अशी सुचना इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association – IMA) केली आहे.

सध्या सेल्फ टेस्ट किटवरुन (Covid self test kid) गदारोळ माजला असून त्यावरील पर्यायी सुचना आयएमएकडून करण्यात आली आहे. तसे निवेदन त्यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना दिले आहे. सहज परवडणारी आणि हाताळण्यास सोपे असल्याने हे किट सर्रास विकले जात आहेत. मात्र यांची नोंद सरकारी यंत्रणेच्या वेबवर (Government website) होत नसल्याने रुग्ण सुटण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे हा काळ कोरोना संसर्गाच्या (corona pandemic) नोंदीत धोकादायक ठरु शकतो.

या पार्श्वभूमीवर सेल्फ चाचणी किट्स सरकारी यंत्रणेशी जोडली गेल्यास नोंदीत स्पष्ट पारदर्शकता येऊ शकते, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्राद्वारे कळवले आहे.

दरम्यान, रॅपिड अँटिजेन टेस्टच्या (Rapid antigen test kit) किटला इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (Indian Council of Medical Research – ICMR) मंजुरी दिली आहे. तर डिसेंबर पंधरावड्यापासून सेल्फ टेस्ट किटची विक्री वाढली. ही विक्री वाढत असताना बहुतांश रुग्ण सौम्य किंवा मध्यम स्वरूपाच्या लक्षणांनी घेरले होते.

Also Read: सेल्फ टेस्टिंग किटबाबत पालिकेला माहिती द्यावी लागणार!

सेल्फ टेस्ट किटव्दारे चाचणी केलेल्या रुग्णांनी मात्र अहवाल पॉझिटिव्ह आल्यास पोर्टलवर नोंदवण्यास टाळाटाळ केली. नागरिकांनी पॉझिटिव्ह आल्याची माहिती लपवून गर्दीत मिसळल्याचा परिणामातून पुढील आठवड्यातच रुग्णसंख्या हजारोंनी वाढली. अचानक झालेली ही रुग्णवाढ दिसून येत असताना छुपी रुग्णवाढ किती असू शकते यावर सरकारी यंत्रणेचे लक्ष गेले.

दरम्यान, ही महामारी आटोक्यात येण्याऐवजी संसर्ग वाढत राहील अशीच भिती निर्माण झाली. त्यामुळेच हे सेल्फ टेस्टकिट एखाद्या क्युआर कोड (QR code) किंवा अन्य कोणत्याही मार्गाने सरकारी यंत्रणेशी जोडले गेल्यास रुग्णनोंद सहज होणे शक्य आहे. त्यामुळे सेल्फ टेस्ट किट यंत्रणेशी जोडल्यास निरीक्षणही मांडता येते, असे या पत्राद्वारे आयएमएच्या राज्य अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे (Dr Suhas Pingale) यांनी आरोग्य मंत्र्यांना कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here