@maharashtracity

इंडियन मेडिकल कॉन्सिलचे पंतप्रधानांना निवेदन

मुंबई: युक्रेनमध्ये (Ukraine) वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणले आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. असे शैक्षणिक नुकसान कोणत्याही विद्यार्थ्यांचे होऊ नये. मात्र या ठिकाणी त्यांना शैक्षणिक प्रवेशित करताना पात्र विद्यार्थ्यांचा विचार करण्यात यावा. यामुळे इतर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच शैक्षणिक दर्जा देखील कायम राहील अशी भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (Indian Medical Association – IMA) घेण्यात आली आहे. तसे निवेदन पंतप्रधान कार्यालयाला देण्यात आले आहे.

दरम्यान, या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया जटिल असून गोंधळ निर्माण करणारी असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. युक्रेन, रशिया (Russia) आणि चीनसारख्या (China) देशात भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी जात असतात. तेथील कमी शैक्षणिक फीमुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी परदेशी जातात. युद्धामुळे भारतीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनला या सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याची आणि भविष्याची चिंता आहे. त्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रात दर्जेदार मनुष्यबळ (skilled manpower in the medical sector) मिळावेत म्हणून आयएमएकडून प्रयत्न सुरु आहेत. या विद्यार्थ्यांचे शिक्षण पुर्ववत करताना इतर विद्यार्थ्यांवर देखील अन्याय होता कामा नये असे प्रयत्न करावे लागणार असल्याचे आयएमएचे म्हणणे आहे.

दरम्यान, शैक्षणिक दर्जा आणि निकष सांभाळण्यासाठी देखील प्रयत्न गरजेचे असल्याचे आयएमएच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. या मुलांना प्रवेश देण्यासाठी केंद्र सरकारला प्रवेश कायद्यात बदल करावा लागणार आहे. ते सोपे नसल्याचेही डॉक्टर सांगतात.

विशेषत्वाने फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट ऍक्टमध्ये (Foreign Medical Graduate Act) बदल करावा लागणार आहे. तसेच विविध वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देताना त्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Medical College) एक्स्ट्रा सीटची परवानगी सरकारकडून मिळवावी लागणार आहे.

स्वस्त वैद्यकीय शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थी युक्रेन रशिया, चीन सारख्या देशात जातात. मात्र येथील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा (substandard medical education) अत्यंत निकृष्ट असल्याने भारतात परतल्यावर पुन्हा वैद्यकीय प्रॅक्टिससाठी पात्रता परीक्षा (Eligibility test) द्यावी लागते. अशा पात्रता परिक्षांमध्ये फक्त १३ टक्के विद्यार्थी पात्र ठरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. या सर्व मुद्यांवर विचार करुन कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये असे प्रयत्न व्हावेत असे आयएमएकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here