@maharashtracity

कृत्रिम तलावातील मूर्ती विसर्जनाला अधिक प्रतिसाद

सायं.६ पर्यंत विसर्जनस्थळी ४,५९७ मूर्तींचे व ५५१ गौरींचे विसर्जन

मुंबई

मुंबईत कोरोनाच्या (corona pandemic) सावटाखाली आतापर्यंतचा गणेशोत्सव (Ganesh Festival) साजरा झाला आहे. दीड दिवसांच्या पाठोपाठ पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या संकटामुळे गणेशभक्तांवर काही कडक नियमांची बंधने सरकारी आदेशाने लादण्यात आली.

मात्र, कोणत्याही प्रकारची विघ्ने दूर करणाऱ्या व गणेशभक्तांचा सदैव पाठीराखा असलेल्या विघ्नहर्ता गणेशाच्या कृपेमुळे भक्तांच्या अंतर्मनातील श्रद्धेवर घाला घालण्यात कोरोना नक्कीच अपयशी ठरला. या कोरोनामय वातावरणात मुंबईकरांची भक्ती, श्रद्धा यांचा विजय झाला.

मंगळवारी दुपारपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत समुद्र, नैसर्गिक तलाव, खाडी आदी नैसर्गिक विसर्जन स्थळी सार्वजनिक ४४ गणेशमूर्तींचे तर ४ हजार ५५३ घरगुती गणेशमूर्तींचे आणि ५५१ गौरींचेही विसर्जन करण्यात आले. यामध्ये, कृत्रिम तलावातील २५ सार्वजनिक गणेशमूर्तींचा व २ हजार ५४७ घरगुती गणेशमूर्तींचा आणि २८८ गौरींचा समावेश आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही असल्याने गणेशभक्तांनी कोरोना नियमांचे पालन करून जास्तीत जास्त कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यावर जोर दिला. पालिकेने घराजवळच कृत्रिम तलावांची व्यवस्था केल्याने गणेशभक्तांनी त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घेतला.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्या गणेशमूर्तींचेही भायखळा निवासस्थान परिसरातील कृत्रिम तलावात विधिवत विसर्जन करण्यात आले.

मुंबई महापालिकेने नैसर्गिक विसर्जन स्थळी व कृत्रिम तलाव स्थळी पालिकेतर्फे कर्मचारी व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, निर्माल्य व्यवस्था चांगल्या प्रकारे केली होती. मात्र गणेश भक्तांनी कोरोना नियमांचे पालन करीत नाईलाजाने घरीच बाप्पांची आरती करून त्यांचे विधिवत विसर्जन केले व बाप्पाला पुढल्या वर्षी लवकर येण्याची आग्रही विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here