@maharashtracity

कोरोनाचे विघ्न दूर करण्याचे साकडे घालत श्रीगणेशाला निरोप

लालबागच्या राजा, मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी

श्रद्धेच्या गर्दीत कोरोनाला चिरडण्याचा भाविकांचा अयशस्वी प्रयत्न

गिरगाव चौपाटीवर हेलिकॉप्टर, ड्रोनद्वारे देखरेख

मुंबई: “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”, “कोरोनाचे संकट कायमचे दूर करा” अशी आर्त साद घालत आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करीत मुंबईकरांनी आज अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने गतवर्षीप्रमाणेच यंदाही राज्यातील, मुंबईतील लाखो गणेश भक्तांना याच कोरोनामय वातावरणात विघ्नहर्ता श्रीगणेशाचे आगमन व विसर्जन (Ganesh Visarjan) करावे लागले.

उल्लेखनीय बाब अशी की, मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे १३ सप्टेंबर २०१९ ला म्हणजे कोरोना नसताना तब्बल २१ तासांच्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले होते. गतवर्षी लालबागच्या राजा मंडळाने मूर्तीची स्थापना न करता आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा केला होता.

यंदा भक्तांच्या आग्रहाखातर लालबागच्या राजाची नेहमीची मूर्ती न बसवता विष्णूदेवतेच्या शेषनागआरूढ स्वरूपातील मूर्तीची प्रतिष्ठपणा करण्यात आली होती. गणेश भक्तांना ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.

कोरोनाची तिसरी लाट व कोरोनामुळे घालण्यात आलेले निर्बंध पाहता यंदा दुपारी १२ ते सायंकाळी ४.१५ या कालावधीत लालबागच्या राजाचे विधिवत, पूजाअर्चा करून गिरगाव चौपाटी येथील खोल समुद्रात निर्विघ्नपणे विसर्जन करण्यात आले.

तत्पूर्वी, लालबागच्या राजाची पोलिसांच्या पूर्व परवानगीने कोरोनावरील लसीचे दोन डोस घेतलेल्या स्थानिक भक्त व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मंडपापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत बँडच्या तालावर वाजतगाजत, नाचत , गुलाल उधळत, गणपती बाप्पाचा जयघोष करीत आणि थोडक्यात धमाल करीत विसर्जन मिरवणूक काढली.

या मिरवणुकीत बच्चे कंपनी, तरुण, तरुणी, महिला, पुरुष आदींनी बँडच्या तालावर कंबर हलवत बेधुंद डान्स एके डान्स केला आणि गणेश विसर्जनाची मागील वर्षाची राहूंन गेलेली कसर भरून काढली.

याच पद्धतीने मुंबईचा राजा गणेश गल्लीतील गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मजा तेथील भक्तगण, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी लुटली. असाच काहीसा नजारा मुंबई शहर व उपनगरे येथील अनेक भागात पाहायला मिळाला. गणेश मंडपापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत बेंजो, नाशिक ढोलच्या तालावर थिरकत गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या.

सायंकाळी ६ पर्यंत ३,९६० गणेशमूर्तीं , ६५ गौरींचे विसर्जन

मुंबईतील ७३ नैसर्गिक व १७३ कृत्रिम तलाव आणि फिरते कृत्रिम तलाव या ठिकाणी पालिकेने गणेश विसर्जनाची चांगली व्यवस्था केली होती. १९ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच दहा दिवसांच्या गणेशमूर्तींसह व गौरींच्या विसर्जनाला सुरुवात झाली.

सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईतील गिरगांव, दादर चौपट्या, शीतल, पवई आदी तलाव या नैसर्गिक व विभागनिहाय कृत्रिम तलावांत मिळून, सार्वजनिक – ४४५ आणि घरगुती – ३,५१५ अशा एकूण ३,९६० गणेशमूर्तींचे आणि ६५ गौरी अशा एकूण ४,०२५ गणेशमूर्तीचे व गौरींचे विसर्जन करण्यात आले. या एकूण विसर्जनात कृत्रिम तलावात विसर्जित १२५ सार्वजनिक गणेश मूर्ती, २,३७५ घरगुती गणेश मूर्तीं अशा एकूण २,५०० गणेशमूर्तींचा आणि ३६ गौरींचा समावेश आहे.

मुंबईत दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गणेशाचे आगमन जल्लोषात होते तसे विसर्जनही उत्साहात केले जाते. गणेश भक्तांनी गुलाल उधळत, पुष्पवृष्टी करीत आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले जाते.

गणेशोत्सव हा मुंबईची शान आहे. मात्र गेल्या मार्च २०२० पासून मुंबईतील या गणेशोत्सवाला व इतर सणांनाही ‘कोरोना महामारीची नजर लागली’. त्यामुळे राज्य सरकारने व मुंबई महापालिकेने या कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. त्यामुळेच कोरोनाची पहिली लाट परतवून लावण्यात आली व दुसरी लाट नियंत्रणात आली आहे.

मात्र आता खरी भीती आहे ती कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची. त्यामुळेच राज्य सरकार व मुंबई महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही कडक निर्बंध आणले.

यावेळी, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत हेलिकॉप्टर व ड्रोनचा (helicopter and drone used to watch Ganesh Visarjan) वापर करून चौपाटी , विसर्जन स्थळी कडक नजर ठेवण्यात आली.

यंदा गणेश मूर्ती विसर्जनात मेट्रो रेल्वेची कामे, खड्डे, धोकादायक उड्डाण पूल यांचे अडथळे निर्माण झाले होते. मात्र त्यावर मात करीत गणेश भक्तांनी गणरायाचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडले. यावेळीही कृत्रिम तलावातील विसर्जनाला चांगला प्रतिसाद लाभला.

बाप्पाच्या विसर्जनाला मुंबईतील मुख्य रस्ते, विसर्जनस्थळी, चौपाट्या आदी ठिकाणी कोरोनामुळे पूर्वीसारखी गणेश भक्तांची गर्दी आढळून आली नाही. मात्र मनातील उत्साह दांडगा होता. या अंतर्गत उत्साहाच्या जोरावरच गणरायाचे विसर्जन करण्यात आले. संपूर्ण मुंबईत पोलिसांचा चोख व कडक बंदोबस्त (Police Bandobast) ठेवण्यात आला होता.

तर, दादर, गिरगाव आदी चौपट्या, तलाव आदी ठिकाणी पालिकेने आरोग्य कक्ष, पाणी, सुरक्षितता, फ्लड लाईट्स, साउंड सिस्टीम, निर्माल्य कलश, जीवरक्षक, अग्निशमन दल, मोबाईल टॉयलेट आदींची व्यवस्था करण्यात आली होती.

शहरातील लालबाग, गिरगावात आणि उपनगरात गणेश मंडप ते मुख्य रस्त्यापर्यंत गणेश विसर्जन मिरवणुकीत नाशिक ढोल, बेंजो वाजवत उपस्थितांचे लक्ष वेधले.

गणेश गल्लीतील मुंबईचा राजा (Mumbaicha Raja of Ganesh Galli), लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) आदी मानाच्या गणपतींना गणेश भक्तांनी कोरोना नियमांचे पालन करीत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

पुढील वर्षी ३१ ऑगस्टला गणेशाचे आगमन

गणेश भक्तांनी , “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ” असा जयघोष करीत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. आता पुढील वर्षी ३१ ऑगस्ट २०२२ रोजी गणेश चतुर्थी असून यंदाच्या तुलनेत बाप्पांचे १० दिवस लवकर आगमन होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांना पुढील वर्षी बाप्पांच्या आगमनसाठी लवकर तयारी करावी लागणार आहे. तर पुढील वर्षी ९ सप्टेंबर २०२२ रोजी अनंत चतुर्दशी असून दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here