@maharashtracity

बेस्टचे दोन कोटी रुपयांचे नुकसान

प्रवाशांचे हाल

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील (MVA) घटकपक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी लखीमपूरखेरी येथील दुर्घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंद दरम्यान बेस्ट परिवहनच्या ८ – १० बसगाड्यांची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. (protestors vandalised BEST buses) त्यामुळे बेस्टची सेवा जवळजवळ ठप्प झाली होती.

या बंदमुळे बेस्टच्या बस सेवेवर आर्थिक परिणाम होऊन बेस्टचे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.

मात्र बेस्ट उपक्रमातर्फे, बेस्टच्या किमान एक हजार बसगाड्या रस्त्यावर धावत होत्या, असा दावा केला आहे.

महाविकास आघाडीतर्फे सोमवारी बंद पुकारण्यात आलेला असताना बेस्ट त्याची भीती न बाळगता पहाटेपासूनच बसगाड्या रस्त्यावर काढल्या. मात्र बेस्टच्या जवळजवळ ८ – १० बसगाड्यांची अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून तोडफोड केली. त्यामुळे बेस्टच्या बसगाड्या रस्त्यावर धावणे जवळजवळ बंद झाले. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

महिला, तरुणी यांचे हाल झाले. बेस्ट बस उपलब्ध न झाल्याने नागरिकांना पर्याय म्हणून रिक्षामधून प्रवास करणे भाग पडले. त्याचा आर्थिक फटका सामान्य मुंबईकरांनाच बसला.

बंद पुकारल्यानंतर मध्यरात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत ८ – १० बसगाड्या व भाडेतत्वावरील एक बसगाडी यांची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलीस संरक्षण मागवले होते.

आघाडी सरकारने ‘बेस्ट’ला नुकसान भरपाई द्यावी -: भाजपची मागणी

राज्यात महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदमुळेच बेस्ट उपक्रमाच्या ८ -१० बसगाड्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच, बेस्टचे दैनदिन आर्थिक नुकसानही झाले आहे. बेस्टचे दररोजचे उत्पन्न अंदाजे सव्वादोन ते अडीच कोटींच्या घरात आहे. त्यामुळे ते आर्थिक नुकसानही झाल्याने राज्य सरकारने, बेस्टला आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपचे बेस्ट समितीमधील ज्येष्ठ सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली आहे. (BJP demands state to compensate losses of BEST buses)

बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांची तोडफोड करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा ठिकठिकाणी असलेल्या सीसी कॅमेरांच्या माध्यमातून पोलिसांनी शोध घ्यावा व त्यांच्याकडून भरपाई वसूल करावी, अशी मागणीही सुनील गणाचार्य यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here