@maharashtracity

मुंबई: मुंबईत अगोदरच कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. पालिका आरोग्य खात्याने विविध उपाययोजना करून कोरोनाच्या पहिल्या लाटेवर मात करून दुसऱ्या लाटेवर चांगलेच नियंत्रणात आणले. आता तिसऱ्या लाटेचे (Third wave of corona) संकट बाकी आहे. असे असताना पालिकेने आता मुंबईला क्षयरोगमुक्त (TB free Mumbai) करण्यासाठी क्षयरोग रुग्णांच्या संपर्कातील निकटवर्तीय व्यक्तिंची विषेश तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे क्षयरोगाच्या प्रसाराला चाप लावता येणार असून प्राथमिक अवस्थेतील क्षयरोग झालेल्या रुग्णांवरही तात्काळ उपचार करता येणार आहेत. त्यामुळे क्षयरोग रुग्णांच्या संख्येत काहीशी कपात होणार आहे. महापालिका क्षेत्रात या प्रकारचा प्रकल्प पहिल्यांदाच राबविला जात आहे.

मुंबई महापालिकेच्या ‘एफ/दक्षिण’ विभाग कार्यालयात ऑनलाईनद्वारे आयोजित कार्यक्रमाला कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्या उपस्थितीत सुप्त क्षयरोग संसर्गाचे मापन व विश्लेषण करणाऱ्या या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाला मुंबईच्या शहर क्षयरोग अधिकारी तथा संबंधीत प्रकल्पाच्या मुख्य अन्वेषक डॉ. प्रणिता टिपरे, ‘शेअर इंडिया’ (Share India) या संस्थेचे प्रमुख डॉ. विजय येळदंडी, प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. सतीश कैपिल्यवार, ‘सीडीसी इंडिया’ (CDC India) या संस्थेच्या डॉ. मेलिसा न्येंदक, ब्रायन कोलोडझिएस्की, लोकेश उपाध्याय, डॉ. राजेश देशमुख व डॉ. क्रिस्टीन आदी मान्यवर ऑनलाईनद्वारे उपस्थित होते.

त्याचबरोबर शेअर इंडिया या संस्थेच्या चमुतील डॉ. संपदा भिडे, डॉ. निकुंज फोफानी, फातिमा खान आदी उपस्थित होते.

सुप्त क्षयरोग संसर्गमापन प्रकल्पामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील क्षयरोग विरोधातील लढ्यास बळ मिळेल आणि क्षयरोग मुक्त मुंबईच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच हा उपक्रम क्षयरोग संसर्गास आळा घालण्यासह क्षयरोग निर्मूलनाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास पालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

यावेळी, शेअर इंडिया या संस्थेचे प्रमुख डॉ. विजय येळदंडी यांनी, पालिकेच्या केईएम रुग्णालयात क्षयरोग विषयक ‘आयजीआरए’ ही वैद्यकीय चाचणी करण्यासाठी आवश्यक ती प्रयोगशाळा स्थापन करणे, त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे; इत्यादी बाबींसाठी त्यांची संस्था महापालिकेला सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here